सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने शहरासह परिसरातील मंगल कार्यालय आणि लॉन्स गर्दीने ओसंडून वहात असून या गर्दीचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याने त्या गर्दीचा फटका सर्वानाच बसत आहे. पंचवटीतून औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद रस्त्यावर पंचवटीपासून तर शिलापूपर्यंत दुतर्फा लॉन्स आहेत. बहुतांश लॉन्समालक शेतकरीच आहेत. शेतातच त्यांनी लॉन्स थाटले आहेत. शेतीला पूरक असा हा व्यवसाय त्यांच्यासाठी चांगलाच वरदान ठरत आहे. लग्नसराईत या रस्त्यावरील सर्वच लॉन्समध्ये गर्दी असते. उन्हाळ्यात लॉन्सवर गोरज मुहूर्तावरील विवाहांची संख्या अधिक राहात असल्याने जो लग्नांचा दिवस असतो, त्या सायंकाळनंतर या मार्गावर वाहतूक कोंडी ठरलेली असते. याआधी नवरदेवाची मिरवणूक थेट रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प होत असे.

वारंवार तसे प्रकार होऊ लागल्याने या रस्त्यावरील लॉन्स हटविण्याची मागणीही वाहनधारकांकडून करण्यात येऊ लागली. त्यामुळे या रस्त्यावरील लॉन्स मालकांनी मिरवणूक काढण्यावर बंदी आणली असली तरी वऱ्हाडी मंडळींच्या वाहनांची गर्दी रस्त्यावर येत असल्याने त्याचा त्रास महामार्गावरील वाहतुकीस होतच आहे.

लग्नांच्या तिथीच्या दिवशी या मार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ होत असल्याने उड्डाणपुलाखालील नवीन आडगाव नाका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होणे नेहमीचे झाले आहे. म्हणजेच औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूकही ठप्प होत आहे.

नवीन आडगाव नाका चौफुलीसह औरंगाबाद महामार्गाला जे रस्ते जाऊन मिळतात त्या प्रत्येक ठिकाणच्या चौफुलींवर ही समस्या निर्माण जाणवत आहे. त्यात अमृतधाम, रासबिहारी, जत्रा या चौफुलींचा समावेश करावा लागेल. या सर्व चौफुलींवरून जाणारा एक मार्ग औरंगाबाद महामार्गाला जाऊन मिळतो. त्यामुळे औरंगाबाद महामार्गावरील लॉन्सच्या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून या चौफुलींची लहान वाहनधारकांकडून वापर केला जातो. या वाहनांची संख्या अधिक असल्याने महामार्ग आणि सव्‍‌र्हिस रोड दोन्ही रस्ते वाहतूक कोंडीने त्रस्त होतात.

नवीन आडगाव नाका येथील एका पेट्रोल पंपजवळ सव्‍‌र्हिस रोडलगतच एक कार्यालय आहे. या ठिकाणी वाहनतळाची कोणतीही व्यवस्था नसल्याने लग्न असो वा इतर कोणताही कार्यक्रम असो. कार्यालयात येणाऱ्या पाहुण्यांची सर्व वाहने सव्‍‌र्हिस रोडवर उभी केली जातात. त्यामुळे या ठिकाणी सव्‍‌र्हिस रोड जवळपास बंदिस्त होऊन जातो. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अशा कार्यालयांना वाहन तळाची व्यवस्था करणे भाग पाडण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी एकच पोलीस

चौफुलींवर वाहतूक पोलीस आपली कामगिरी पार पाडत असले तरी एकाच पोलिसाच्या खांद्यावर सर्व वाहतुकीचे नियंत्रण करण्याचा बोजा येत असल्याने वाहतूक पोलीस एका सव्‍‌र्हिस रोडवरून दुसऱ्या सव्‍‌र्हिस रोडकडे गेल्यास पहिल्या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडतो. चौफुली ओलांडताना इतर वाहनांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांमध्येच वाद निर्माण होऊन त्यांची वाहने एकाच ठिकाणी उभी राहात असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. काही वाहनचालक पोलिसांच्या सूचनांचे पालन न करता आपली वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत असल्याने इतरांसाठी ती डोकेदुखी ठरते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding in nashik city create traffic problems
First published on: 22-04-2017 at 03:09 IST