नाशिक – लवकरच घराघरात गणरायांचे आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागताची लगबग सार्वजनिक गणेश मंडळाकडून सुरू असतांना घरगुती गणेशोत्सवासाठीही सजावटीची चर्चा रंगु लागली आहे. यंदा राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्य उत्सव जाहीर करण्यात आल्याने यावेळी उत्सवाच्या वेगवेगळ्या छटा दिसणार आहेत. उत्सव काळात पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील वॉव समूहाच्या वतीने आरंभ अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी गणेशोत्सवाकरिता धातूची मूर्ती हा पर्याय दिला जात आहे.
गणेशोत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक अनोखा उत्साह संचारतो. गणेशोत्सवात मूर्ती कशी असावी, यासाठी अनेक दिवसांपासून विचार मंथन केले जाते. बाजारपेठेत वेगवेगळ्या रुपातील गणरायांच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. काही मूर्तीकारांकडून मूर्तींवर अखेरचा हात फिरविणे सुरू आहे. उत्सव काळात पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी येथील वुमन ऑफ विस्डम (वॉव) संस्थेने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने आरंभ अभियानाच्या माध्यमातून गणेशोत्सवात धातूच्या मूर्तीला प्राधान्य द्यावे, यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता मानले जातात. गणेशोत्सव आपल्या श्रध्देचा, भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आहे. परंतु, या उत्सवात नकळत निसर्गाच्या ऱ्हासाला कारणीभूत काही गोष्टी घडतात. हे कोणाच्या लक्षात येत नाही. गणेश मूर्तीत प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडुमातीचा वापर होतो. शाडु माती असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती असोत, त्यांचे विसर्जन करताना अडचणी येतात. पीओपीची मूर्ती लवकर पाण्यात विरघळत नाही. मूर्ती विसर्जनानंतर शाडुमातीचे करायचे काय, हा प्रश्न सतावतो. ही माती झाडे किंवा अन्य ठिकाणी वापरता येत नाही. या पार्श्वभूमीवर वॉव संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि जलप्रदुषण टाळण्यासाठी धातूची मूर्ती वापरण्याचा पर्याय देण्यात येत आहे.
याविषयी वॉव संस्थेच्या अश्विनी न्याहारकर यांनी माहिती दिली. गणेश मूर्ती आणण्यात बऱ्याचदा स्पर्धा जाणवते. मोठ्या आकारातील मूर्ती आणल्या जातात. काहींकडून पर्यावरणपूरक म्हणून शेण,माती किंवा कागद आदींचा वापर करुन गणेश मूर्ती तयार केल्या जातात. परंतु, या मूर्ती उत्सव काळात सजविण्यात मर्यादा येतात. यासाठी धातूची मूर्ती हा पर्याय देण्यात आला असल्याचे न्याहारकर यांनी सांगितले. मागील वर्षी वॉव सदस्यांकडून सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये धातू मूर्तीविषयी प्रबोधन करण्यात आले होते. यंदाही शाळा, महाविद्यालयांमध्ये या अनुषंगाने प्रबोधन करण्यात येत आहे. पंचधातु किंवा पितळेची मूर्ती उत्सव काळात दहा दिवसांसाठी ठेवण्यात यावी. उत्सवमूर्ती म्हणून धातूची तर पूजेसाठी सुपारी ठेवत विसर्जनाच्या दिवशी सुपारीचे विसर्जन करण्यात यावे. यासाठी प्रबोधन करण्यात येत असल्याचे न्याहारकर यांनी सांगितले.
गणेशोत्सवात जलप्रदूषण टाळण्यासाठी इतर कोणत्याही मूर्तीपेक्षा धातूच्या मूर्तीचा उपयोग करण्यात यावा, यासाठी वाॅव संस्थेच्या वतीने प्रबोधन करण्यात येत आहे. त्यासाठी संस्थेकडून आरंभ अभियान सुरु करण्यात आले आहे.