नाशिक : शरद पवार यांनी माफी मागितली याचे वाईट वाटत आहे. राज्यभरात कुठे कुठे माफी मागत फिरणार, असा खोचक प्रश्न मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. येवला येथील जाहीर सभेत शनिवारी शरद पवार यांनी भुजबळ यांच्याविषयीचा आपला अंदाज चुकल्याने येवलेकरांची माफी मागण्यासाठी आपण आलो असल्याचे नमूद केले होते. पवार यांनी केलेल्या आरोपांना रविवारी भुजबळ यांनी येथे पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. येवला मतदारसंघाची आपणच निवड केली होती, असे त्यांनी सांगितले.
येवल्यातील लोकांच्या सांगण्यावरून तेथे कामाची संधी असल्याने येवल्याची निवड केली. प्रेम आणि कामासाठी संघर्ष यामुळे येवल्यातील नागरिकांनी चार वेळा निवडून दिले. अशा ठिकाणी पवारसाहेब हे भुजबळ यांची निवड करण्यात चुकलो, असे म्हणतात. हे पवारांनी म्हणणे साफ चुकीचे आहे. बारामतीनंतर खरा विकास येवल्यात झाला असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला.
येवल्यात माफी मागितली. आता नागपूर, धुळे अशा पन्नास ठिकाणी माफी मागणार का, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. पवार यांच्या सभेचे नियोजन हे राष्ट्रवादीतून जानेवारी २०२० मध्ये शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केलेल्या माणिकराव शिंदे यांनी केले. दराडे बंधूंचेही सभेसाठी सहकार्य लाभले. येवल्यातील बहुतांश तरुण आपल्या स्वागताला होते. थकलेले, वृद्ध, जे काही काम करीत नाहीत ते पवारांच्या सभेला होते, असेही ते म्हणाले.