नाशिक – शिवसेनेचे चार तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संंजय राऊत यांनी केल्यामुळे राज्यातील हे खासदार कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) वाट्याला उत्तर महाराष्ट्रातील सहापैकी केवळ नाशिकची एकमेव जागा आली होती. यामुळे पक्षांतर करणारे अन्य खासदार राज्याच्या इतर भागातील असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे रंग भरत आहेत. सोमवारी ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी शिवसेनेच्या चार तरुण खासदारांनी हनी ट्रॅप प्रकरणामुळे पक्षांतर केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. ही नावे सर्वांना माहिती असल्याचा दावा करुन त्यांनी ती उघड केली नाहीत. त्यांच्या पक्षांतराचा हिंदुत्वाशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कुठेही हनी ट्रॅप नसल्याचे स्पष्ट केल्याने त्याविषयी राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तत्कालीन मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे गटात टप्प्याटप्प्याने सहभागी झाले. पक्षांतर करणाऱ्यांमध्ये ेनाशिकचे तत्कालीन खासदार हेमंत गोडसे आघाडीवर होते. शिवसैनिकांच्या जनक्षोभाला सामोरे जावे लागू नये म्हणून त्यांना पोलीस संरक्षणही द्यावे लागले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हेमंत गोडसे यांची कथित आक्षेपार्ह चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसारित झाली होती. राजकीय विरोधकांनी खोडसाळपणा करुन ही चित्रफीत तयार केल्याची तक्रार गोडसे यांनी पोलिसांकडे केली होती. राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे गोडसेंशी संबंधित चित्रफितीची आठवण ताजी झाली.
उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. महायुतीच्या जागा वाटपात यापैकी केवळ एक जागा शिंदे गटाला मिळाली होती. ती म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ. या जागेवर शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना पराभूत व्हावे लागले. पक्षांतर्गत राजकारणाला वैतागून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. या एकंदर परिस्थितीत खासदार संजय राऊत यांच्या आरोपांविषयी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. पक्षांतर करणारे खासदार कोण, याचा अंदाज बांधला जात आहे.
छगन भुजबळांकडून टोलेबाजी
खासदार राऊत यांच्या् आरोपांबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री यांनी प्रतिक्रिया देतांना खास शैलीत टोलेबाजी केली. मुंबईला मी घरी असतो. नाशिकला आल्यावरही घरीच असतो, असा टोला त्यांनी हाणला. हनी ट्रॅप प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. त्यावर आपण भाष्य करणे योग्य नाही. पोलीस यंत्रणा जे करेल ते आमंत्रण देऊन करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.