नाशिक : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद पुन्हा एकदा राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी सिध्द केले आहे. गुरूवारी मनमाड आगाराची राजापूर मुक्कामी असलेली बस परत येत असताना महिला प्रवाशाला प्रसुती कळा सुरू झाल्याने चालक आणि वाहक यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बस थेट उपजिल्हा रुग्णालयात नेल्याने महिलेची सुखरूप प्रसूती झाली.

राजापूर मुक्कामी बस गुरूवारी सकाळी मनमाडकडे निघाली असता भालूर येथे सुनीता ढगे या बसमध्ये बसल्या. बस पुढे गेल्यानंतर त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. मनमाड रेल्वे उड्डाणपूल येथे बस आली असता त्यांचा त्रास अधिक वाढल्याने त्यांच्याबरोबर असलेल्या वृध्द महिलेने चालक राहुल पवार आणि वाहक संजय पवार यांना बस थांबवण्याची विनंती केली. सुनेला रिक्षातून दवाखान्यात न्यावे लागणार आहे .तिची प्रसूती कधीही होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

चालक आणि वाहक यांनी चर्चा करत बस मनमाडच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेली. परंतु, त्याआधीच सुनिता यांची बसमध्येच प्रसूती झाली. बाळ आणि आई दोघांना बसमधून रुग्णालयात आरोग्यसेविकांनी दाखल केले. उपस्थित सर्व प्रवासी आणि नागरिकांनी दोघा चालक आणि वाहकांनी दाखविलेल्या प्रसंगावधनाचे कौतुक केले. या कार्यासाठी आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी चालक राहुल पवार आणि वाहक संजय पवार यांचा सत्कार केला.