धुळ : येथील जुने धुळे भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने मंगळवारी संतप्त महिलांनी महापालिकेवर मोर्चा काढला. पाच महिन्यांपासून या भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची रहिवासी ओरड करीत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. सात दिवसांत समस्या न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – नाशिक : आचारसंहितेचे सावट हटल्यानंतर निधी खर्चाची कसरत

हेही वाचा – जळगाव : जिल्हा बँक अध्यक्षपदाचा देवकर यांचा राजीनामा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. सचिन शेवतकर, आकाश परदेशी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जुने धुळे भागातील प्रामुख्याने सुपडू आप्पा कॉलनीसह विविध भागांत पाच महिन्यांपासून दूषित आणि पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असून याविषयी रहिवाशांनी महापालिकेला वारंवार माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर, याविरोधात महिलांनी संबंधित लोकप्रतिनिधी, मनपा कर्मचाऱ्यांकडे तक्रारीही केल्या. परंतु, दखल घेण्यात आलेली नाही. अखेर, या भागातील महिला एकत्र येत महापालिकेत धडकल्या. उपायुक्त विजय सनेर यांची भेट घेतली. सनेर यांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना बोलावून संतप्त महिलांच्या भागातील पाणी पुरवठ्याची माहिती घेतली. अंकिता जाधव, उषा बडगुजर, शकुंतला बडगुजर, बेबाबई बडगुजर, सुनंदा माळी आदी महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.