scorecardresearch

Premium

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी साहित्यिक कुटुंबात जन्म घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत, महाराष्ट्रात आल्यावर एक नाटक पाहून डोळे उघडल्याची आठवण सांगितली.

Javed Akhtar Marathi Sahitya Sammelan
ते नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात बोलत होते.

ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी साहित्यिक कुटुंबात जन्म घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत, महाराष्ट्रात आल्यावर एक नाटक पाहून डोळे उघडल्याची आठवण सांगितली. “मी हिंदी, उर्दू, बंगाली भाषांतरीत आणि युरोपीयन साहित्य वाचलं होतं. त्यामुळे मला सर्व माहिती आहे, माझ्यासारखा कुणीच नाही असं वाटत होतं. मात्र, मराठीतील ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक पाहून कुणीतरी माझ्या तोंडात मारली आणि मी खुर्चीवरून खाली पडल्यासारखं वाटलं,” अशी आठवण सांगितली. ते नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य आणि महाराष्ट्राची थोरवीही सांगितली.

जावेद अख्तर म्हणाले, “मी मुंबईत, महाराष्ट्रात आलो तेव्हा १९ वर्षांचा असेल. उत्तरेत राहत होतो आणि मला हिंदी आणि उर्दू भाषा माहिती होती. युरोपचं साहित्यही वाचलं होतं. बंगालचं उर्दू, हिंदीत भाषांतर झालेलं साहित्य वाचलं होतं. तेव्हा मला वाटायचं मी तर मी आहे, माझ्यासारखा कुणीच नाही. आमची भाषा, साहित्य आहे त्यापुढे कोण आहे असं वाटायचं. तेव्हा माझे काही महाराष्ट्रीयन मित्र मला एक मराठी नाटक पाहायला घेऊन गेले. मी त्यांना म्हटलं मला तर समजणार नाही. ते म्हटले तू चाल, आम्ही तुला सांगत राहू.”

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

हेही वाचा – गोरेगावात विजय तेंडुलकर महोत्सव साजरा

“‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं”

“मी ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक पाहिलं. मला ते नाटक पाहून वाटलं की कुणीतरी माझ्या तोंडात मारलीय आणि मी खुर्चीखाली पडलोय. मला माझ्या स्वतःचीच लाज वाटली. मी साहित्यच साहित्य असलेल्या कुटुंबात जन्म घेऊनही मला या महान लेखकाविषयी काहीच माहिती नाही. यानंतर मी विजय तेंडुलकरांचे इतर नाटकं देखील पाहिली आणि समजून घेतली. मी असा लेखक पाहिला नव्हता आणि माझे डोळे उघडले,” असं जावेद अख्तर यांनी सांगितलं.

“जनतेशी संवाद साधला तोच मराठीचा मोठा साहित्यिक”

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “८०० वर्ष असो की ४०० वर्ष असो की २०० वर्षे, मराठीचा मोठा साहित्यिक तोच आहे ज्याने केवळ जनतेशी संवाद साधला. त्या साहित्यिकांनी मी किती मोठा बौद्धिक व्यक्ती आहे हे सांगितलं नाही, त्यांनी सामान्य माणसाला समजणार नाही असं तत्वज्ञान सांगितलं नाही. ते सामान्य माणसांशी बोलत होते. ते मग संत तुकाराम असो, संत नामदेव, संत एकनाथ असो की त्याआधी अगदी संत ज्ञानेश्वर असो. संत ज्ञानेश्वर त्यांचे भाऊ आणि बहिण मुक्तादेवी.”

” साहित्यिक सर्वसामान्यांना ज्ञान देतो ते काहींना आवडत नाही”

“संत ज्ञानेश्वर ८०० वर्षे जुने आहेत. मात्र, ज्ञानेश्वरांनंतर ४०० वर्षांनी बनारसमध्ये समांतर साहित्यिक झाले. त्याचं नाव महाकवी तुलसीदास. तुलसीदासांनी रामायणाच्या कथा रामचरितमानस लिहिले आणि या कथा गावागावात पसरल्या. त्यावेळी संस्कृत तर कुणाला कळत नव्हतं. मात्र तुलसीदासांची भाषा शेतकरी, कामगार, सामान्य माणसाची भाषा होती. त्यांनी सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहचवली हे काही लोकांना आवडलं नाही. त्यांचा सामाजिक बहिष्कार झाला. जेव्हा एखादा साहित्यिक सर्वसामान्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, त्यांना जागं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही लोकांना वाईट वाटतं,” असंही जावेद अख्तर यांनी नमूद केलं.

हेही वाचा – ‘तें – एक श्राव्य अनुभव’

“सध्या साहित्यिकांनी रस्त्यावरील व्यक्तीचं दुःख आणि घामावर लिहिलं की राष्ट्रविरोधी ठरवलं जातं”

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “जुन्या राजा महाराजांना आणि आत्ताच्या जमिनदार, जहागिरदारांनाही साहित्य आवडतं. मात्र, ते तोपर्यंतच आवडतं जोपर्यंत कवी, लेखक चंद्र, प्रेम यावर लिहितो. हेच साहित्यिक जेव्हा रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील दुःखावर लिहितो, अश्रू आणि घामावर लिहितो तेव्हा त्यांना ते धोकादायक वाटतात. आधी त्यांना वाईट वाटायचे, आता तर हे साहित्यिक राष्ट्रविरोधी देखील होतात.”

“एका गोष्टीसाठी मराठी समाजाने कितीही अभिमान केला तरी कमी पडेल”

जावेद अख्तरांनी महिला साहित्यिकांवर बोलताना सांगितलं, “मराठी भाषा आणि मराठी समाजाने कितीही अभिमान बाळगला तरी तो कमी पडेल अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांची एक बहीण होती आणि ती देखील कविता लिहित होती. युरोपमध्ये तर कुणीच कविता लिहिणारी महिला नव्हती. ८०० वर्षांचं सोडा १८ व्या आणि १९ व्या शतकात फ्रान्समध्ये खूप मोठी महिला कादंबरीकार जॉर्ज सँड या पुरुषाच्या नावाने लिहायची. इंग्लंडमध्ये एक महिला जॉर्ज इलिएट नावाने लिहायची. मोठ्या लेखिका असूनही त्यांना पुरुषांच्या नावाने लिहावं लागलं. कारण बाई कसं लिहू शकते असा विचार २००-२५० वर्षांपूर्वी युरोपमध्ये होता.”

“भारतातच काय, युरोपातही ८०० वर्षांपूर्वी महिला साहित्यिक नव्हती, मराठीत होती”

“आमच्याकडे ८०० वर्षांपूर्वीची कवयित्री आहे. आपल्याला त्यावर अभिमान बाळगला पाहिजा. ही सामान्य गोष्ट नाही, खूप मोठी आहे. आपल्याकडे मुक्ताबाईच नाही तर त्यानंतर बहिणाबाई देखील झाल्या. मीरा तर यांच्या ४०० वर्षांपूर्वी झाली. मात्र, ८०० वर्षांपूर्वी भारतात मराठीशिवाय कोणत्या इतर भाषेत महिला साहित्यिक असल्याची माझी माहिती नाही. त्यामुळेच भारताची पहिली महिला डॉक्टर देखील महाराष्ट्रीय होती हे आश्चर्यकारक नाही. महाराष्ट्राच्या सभ्यतेत इतर ठिकाणांपेक्षा महिलांसाठी अधिक आदर होता,” असं निरिक्षण त्यांनी मांडलं.

हेही वाचा – तेंडुलकरांच्या नाटय़भूमीची पाळेमुळे

साहित्य आणि राजकारणाचा संबंध काय? जावेद अख्तर म्हणतात…

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “साहित्य आणि राजकारणाचा संबंध काय? असं अनेकदा विचारलं जातं. मला अनेक लोकं भेटतात जे चांगली गाणी, कथा लिहितात. ते म्हणतात आम्हाला राजकारणात रस नाही. मी त्यांना सांगितलं की हे म्हणणं म्हणजे मला प्रदुषणात रस नाही असं म्हणण्यासारखं आहे. तुम्हाला प्रदुषणात रस असो नसो, तुम्हाला श्वासात तर तिच प्रदुषित हवा घ्यायची आहे. हे म्हणजे असं आहे की तुम्ही नदीत उभे आहात आणि पाणी वाढतंय, गळ्यापर्यंत आलंय आणि तुम्ही म्हणत आहेत की मला पाण्यात रस नाही. तुम्हाला रस असो नसो ते पाणी वाढतच आहे. ते पाणी तुम्हाला बुडवू देखील शकतं.”

“साहित्यिकाने कोणत्याही पक्षाचा बांधील होऊ नये”

“साहित्यिकाला राजकारणात जायला हवं का? तर नाही, तसं करणंही चुकीचं होईल. प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते, मतदारसंघ असतो. त्यांना काही गोष्टी बोलण्याची परवानगी नसते. याला कोणताही अपवाद नाही. लोकशाहीसाठी जशी संसद, विधानसभा, राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष गरजेचे आहेत, तसेच असे नागरिक जे कोणत्याही बंधनात नाही गरजेचे आहेत. त्यांच्या मनाला पटेल ते त्यांना बोलता येईल. त्यांना जे लिहायचं आहे ते लिहावं. साहित्यिकाला कोणत्याही पक्षाचा बांधील व्हायला नको. साहित्यिकाला एक संस्कार, आदर्श आणि आपल्या देशाशी इमान राखलं पाहिजे. आम्हाला जे बरोबर वाटतं आम्ही ते बोलणार, ज्यांना आवडेल त्यांना आवडेल, वाईट वाटेल त्यांना वाईट वाटो. हे स्वातंत्र्य साहित्यिकाकडे असायला हवं. सत्य हे आहे की सामान्य नागरिक असो की साहित्यिक हे स्वातंत्र्य कमी होत आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : ‘लाजिम है की हम भी देखेंगे’ हिंदू धर्मविरोधी म्हणणे म्हणजे हास्यास्पद -जावेद अख्तर

अण्णाभाऊ साठेंविषयी बोलताना त्यांनी प्रगतीशील साहित्यिकांच्या परिषदेचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “१९३६ मध्ये प्रगतीशील साहित्यिक परिषद तयार झाली. तेथे अण्णाभाऊ साठे गेले होते. त्यांचं पहिल संमेलन लखनौमध्ये झालं. तिथं प्रत्येक भाषेतील लेखक होता. तिथं एक ठराव संमत झाला. तो ठराव होता आमची लेखणी आजपासून प्रेमकथा, फुल-ताऱ्यांच्या गोष्टी लिहिणार नाही. आजपासून आमची लेखणी देशाच्या स्वातंत्र्याविषयी लिहील, समाजातील विषमतेवर लिहील, स्त्रीयांच्या सक्षमीकरणासाठी लिहील.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2021 at 23:39 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×