अंध विद्यार्थ्यांना परीक्षेप्रसंगी ‘लेखनिक’ मिळत नसल्याने अनेक अडचणी येतात. या अडचणींवर मात करण्यासाठी येथील नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) ने पुढाकार घेतला आहे. सामाजिक संस्थेच्या वतीने अंध विद्यार्थ्यांची लेखनिकची अडचण दूर व्हावी, यासाठी नॅबच्या वतीने संगणक प्रणालीच्या आधारे ‘स्वलेखन कार्यशाळा’ घेण्यात आली. यामुळे पुढील काळात विद्यार्थी कोणत्याही परीक्षेला लेखनिकविना सामोरे जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दृष्टिहीन असले तरी ब्रेल लिपीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वृद्धिंगत होते. वेगवेगळ्या दृक्श्राव्य माध्यमांचा वापर करत त्यांच्या सामान्य ज्ञानात, माहितीत भर पडत राहते. परीक्षेच्या वेळी हे कौशल्य लिखाणाद्वारे मांडण्यात त्यांना मर्यादा येतात. यावर शिक्षण मंडळाने त्यांना लेखनिकचा पर्याय दिला. मंडळाच्या निकषाप्रमाणे लेखनिक मिळेलच असे नाही. लेखनिकचे मानधन, त्याचा वेळ, अंध परीक्षार्थीचा उत्तरे सांगण्याचा वेग, परीक्षेच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा ही अडथळ्यांची शर्यत पार करत अंध परीक्षार्थीला पुढे जावे लागते. हा गुंता सुटावा यासाठी नॅबने पुढाकार घेतला आहे.
पुणे येथील सामाजिक संस्था ‘निवांत’च्या सहकार्याने अंध परीक्षार्थीना लेखनिकची अडचण भासू नये यासाठी संगणक प्रणालीचा वापर करत नॅबने ७५ मुलामुलींना विशेष प्रशिक्षण दिले आहे. वैशाली लहरे, वर्षां साळुंके, वर्षां देशमुख यांच्यासह नॅबच्या प्रशिक्षकांनी संगणकाचा वापर करत स्वलेखन कसे करावे, याची माहिती प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे, मार्च महिन्यात झालेल्या १२ वी परीक्षेत अंध विद्यार्थिनीने सर्व प्रश्नपत्रिका लेखनिकशिवाय संगणकाच्या मदतीने सोडवल्या. तिच्या या प्रयत्नांना मुंबई विद्यापीठाची साथ मिळाली. त्या दृष्टीने नॅब शिक्षण मंडळासोबत चर्चा करत राज्यातील एक हजारांहून अधिक अंध विद्यार्थ्यांपर्यंत ही संगणक प्रणाली-प्रशिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दिली. पुढील टप्प्यात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमधील विद्यार्थ्यांपर्यंत निवांतच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात येईल, असे मुनशेट्टीवार यांनी नमूद केले.