नाशिक : शहरात मंगळसूत्र हिसकाविण्याप्रमाणेच टोळक्यांचे हल्ले, हत्या या घटना नियमित झाल्या आहेत. पोलिसांकडून कठोर उपाययोजना करण्यात येत नसल्याचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत. रविवारी रात्री पांडवलेणी परिसरात किरकोळ भांडणातून टोळक्याने चाकू आणि तलवारीने हल्ला करुन युवकाची हत्या केली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून शहरात हत्या होत आहेत. भररस्त्यात किरकोळ कारणावरून एकमेकांच्या हत्या केल्या जात आहेत. एखाद्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन तलवारी, कोयते, चाकू बाहेर काढले जातात. वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण आहे की नाही, असे सध्याचे चित्र आहे. सातपूर येथे एका भांडणात मध्यस्थी करणाऱ्याचीच हत्या करण्यात आली. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच रविवारी रात्री १० वाजता पांडवलेणी पायथ्याशी एका युवकाची हत्या झाली.

हॉटेल माऊंटनसमोर जुन्या वादातून तीन ते चार हल्लेखोरांनी तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवली. त्यात रामदास बोराडे (१९, रा. ज्ञानगंगा सोसायटी) या युवकाची हत्या झाली. राजेश बाेराडे गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एका संशयिताला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. हल्लेखोरांनी हाॅटेलबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडत दहशत माजवली. हॉटेल व्यवस्थापक रोशन मेणे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला केला. त्यातील रामदासवर तलवारीने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलीस घटनास्थळी आल्यावर टोळक्याने त्यांच्यावरही तलवार उगारण्याचा प्रयत्न केला. इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले.