धुळे शहरात थंडीचे प्रमाण वाढत असून शाळेत जाणार्या लहान मुलांना मोठ्या प्रमाणात थंडीचा त्रास होत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ बदलण्यात यावी, अशी मागणी जिल्हा युवासेनेतर्फे शिक्षणाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत युवासेनेने दिलेल्या निवेदनानुसार, अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून दररोज शिक्षणासाठी शहरात येतात. भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत वाहनाने येणे म्हणजे कसोटीच. काही पालक तर दुचाकीवरुन मुलांना शाळेपर्यंत सोडायला येतात. थंडीमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. मुलांना शाळेत सोडताना पालकांचीही कसरत होते. त्यामुळे या समस्यांचा गांभीर्याने विचार करुन शाळांच्या वेळेत योग्य तो बदल करावा, अशी मागणी युवासेना सहसचिव यशवर्धन कदमबांडे, जिल्हाप्रमुख हरीष माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, राज माळी, महानगर प्रमुख सिद्धार्थ करनकाळ आदींनी केली आहे.