वाहतूक पोलिसांचे नियोजन; टोलमाफीसाठी व्यवस्था

नवी मुंबई  : गणेशोत्सवासाठी कोकणात व विविध जिल्ह्यत जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस  सज्ज आहेत. गुरुवारी रात्रीपासून अनंतचतुर्थीपर्यंत २४ तास बंदोबस्त ठेवला जाणार  कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

सोमवारी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून गुरुवारपासूनच गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. वाशी टोलनाका ते कामोठेपर्यंत काही भागात कामे सुरू आहेत. पुढील पाच दिवस वाहनांची संख्या वाढणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी नियोजन केल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारपासून टोलमाफीसाठी द्यावयाच्या स्टिकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत सर्वच वाहतूक पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द केल्या आहेत. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी रबाळे ते तुर्भे, वाशी ते तुर्भे, तुर्भे ते खारपाडा टोल या विविध मार्गावर ५०० वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. १२ तासाप्रमाणे दोन शिपमध्ये २४ तास चोख वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ  नये म्हणून पेट्रोलिंगसाठी वाहतूक गाडय़ा व मोटारसायकल पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. शहरातून मोठय़ा प्रमाणावर वाहने येणार असल्याने अचानक एखाद्या ठिकाणी गाडी बंद पडून वाहतूकोंडी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अपघात झाल्यास खासगी रुग्णालये व शासकीय रुग्णालये यांना राखीव व्यवस्था करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षेत्रात २४ तास वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी गणेशभक्तांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

-सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक विभाग, नवी मुंबई</strong>