News Flash

महामुंबई क्षेत्रात २४ हजार घरे विक्रीविना?

गेली पाच वर्षे बांधकाम क्षेत्रात आर्थिक मंदी मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.

महामुंबई क्षेत्रात २४ हजार घरे विक्रीविना?

अनेक सवलतींनंतर प्रतिसाद नाही; नवी मुंबई विमानतळाच्या बांधकाम प्रारंभानंतरची उभारी अल्पकालीन

नवी मुंबई : मागील तीन वर्षांत राज्यात बांधण्यात येणाऱ्या सहा लाख ७० हजार घरांपैकी ३ लाख ५० हजार घरे विक्रीविना पडून असून यात महामुंबई क्षेत्रातील संख्या २४ हजार ५७७ घरांची आहे. त्यामुळे अनेक सवलती देऊन ग्राहकांचा कल घर विकत घेण्याकडे वळलेला नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. महामुंबईच्या पनवेल, उरण तालुक्यात मोठय़ा प्रमाणात परवडणाऱ्या घरांची उभारणी सुरू आहे.

गेली पाच वर्षे बांधकाम क्षेत्रात आर्थिक मंदी मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे घर खरेदीसाठी ग्राहकांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. यात सोने, वाहन, स्टॅम्प डय़ुटी, परदेशी सहल, शून्य आरक्षण, अशा अनेक सवलती दिल्या गेलेल्या आहेत. यात यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदान करणाऱ्या ग्राहकांनाही सवलत जाहीर करण्यात आली होती. नवी मुंबईतील एका बडय़ा विकासकाने अलीकडेच सर्व रिअल इस्टेट एजन्टसाठी एक मुंबई-गोवा इंटरनॅशनल क्रूझ सफर घडवून आणली. प्रकल्पात जास्तीत जास्त घरांचे आरक्षण आणावे यासाठी ही सरबराई होती. मागील वर्षी नवी मुंबई विमानतळाच्या प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर महामुंबई क्षेत्रात काही अंशी घर आरक्षणाला उभारी आली होती, पण त्यानंतर हा उत्साह मावळल्याचे दिसून येते.

सिडकोने काढलेल्या सोडतीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता, मात्र त्यातही ११०० घरे शिल्लक राहिल्याने ती विकण्यासाठी सिडकोला पुन्हा सोडत काढण्याची वेळ आली होती. खासगी विकासकांनी मोठय़ा प्रमाणात गृहप्रकल्प हाती घेतले असून मुंबई-पुणे दुतग्रती मार्गालगत असलेल्या दोन बडय़ा विकासकांनाही आरक्षणासाठी जाहिरातीचा मारा करण्याची वेळ आली आहे. मुंबईनंतर महामुंबई क्षेत्रात मेट्रो, जलवाहतूक यांचे जाळे विणले जात असून ग्राहकांचा कल महामुंबईकडे वळू लागला आहे, पण घरांचे दर गगनाला भिडू लागल्याने या ठिकाणीही सर्वसामान्य नागरिक घर खरेदी करताना विचार करू लागला आहे.

रोजगारनिर्मितीवर गडांतर आल्याने नवीन ग्राहक ही घरे घेण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामुंबईच्या पनवेल, खारघर, कळंबोली, कोपरा, उरण द्रोणागिरी या क्षेत्रात २४ हजारांपेक्षा जास्त घरे विक्रीविना पडून आहेत.

सिडकोच्या घरांकडे लक्ष

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या भूखंडावरही मोठय़ा प्रमाणात घरांची निर्मिती झाली असल्याने या ठिकाणी घरांची संख्या वाढली आहे. येत्या काळात सिडकोच्या ९० हजार घरांची महानिर्मिती सोडत निघणार असून यानंतर खासगी विकासकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सिडकोची घरे बाजारात विक्रीसाठी येणार असल्यानेही खासगी विकासकांकडे ग्राहक फिरकत नसल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 4:38 am

Web Title: 24 thousand homes without sale in maha mumbai
Next Stories
1 गाढी नदीपात्र जलपर्णीमुळे धोक्यात
2 बारा तासांनंतर वीज आली तीही बेभरवशाची
3 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला
Just Now!
X