वाशीतील भावे नाटय़गृहात जम्बो लसीकरण केंद्र

नवी मुंबई : ऑगस्ट महिन्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य करोना लाटेला सामोरे जाण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हा मृत्युदर रोखण्याचा एक पर्याय असल्याने पालिका शहरात जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे उभारत आहे. त्यातील सर्वात मोठे लसीकरण केंद्र वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात उभारले जाणार आहे. या ठिकाणी एक वेळी एक हजार नागरिकांचे लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई पालिकेने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अतिदक्षता खाटा, जीवरक्षक प्रणाली, प्राणवायू आणि साधे रुग्णशय्या वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिसऱ्या लाटेत अत्यवस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता रुग्णशय्यांची गरज लक्षात घेऊन पाचशे रुग्णशय्या संख्या वाढविली जात आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना करोनामध्ये मृत्यू होण्याचा धोका कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व देशांत लसीकरणावर भर दिला जात आहे. देशात लसीचा तुटवडा भासत असून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईप्रमाणे नवी मुंबई महापालिकेनेही जागतिक निविदा काढली आहे. ही लस मिळाल्यानंतर शहरात लसीकरण केंद्रांत वाढ करण्यात येणार आहे. लस मिळाल्यानंतर झटपट लसीकरण करता यावे यासाठी पालिका वाशी येथील भावे नाटय़गृहात जम्बो लसीकरण केंद्र उभारणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली असून एका दिवसात या ठिकाणी एक हजार नागरिकांचे लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय नवी मुंबईतील सीवूड्स मॉल्ससारख्या मोठय़ा  मॉल्सच्या ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जाणार असून शहरातील पाच हजारांपेक्षा जास्त सहकारी गृहनिर्माण सोसायटीत जाण्यासाठी दोनशे वाहनांद्वारे पोहोचले जाणार आहे. या दोनशे वाहनांद्वारे दिवसाला दोनशे नागरिकांचे लसीकरण केले जाणार असून ही संख्या दिवसाला चार ते पाच हजार लसीकरणाची होऊ शकणार आहे. नवी मुंबई पालिकेला दिवसाला २५ ते ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी सुरू केली असून शहराची लोकसंख्या दहा लाख पन्नास हजार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

जादा दर देण्याची पालिकेची तयारी

लस खरेदी करण्याची काही पालिकांची तयारी पाहता राज्य शासन शासनाच्या वतीने जागतिक निविदा काढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडे येणारी मागणी मोठय़ा असल्याने त्याला प्रतिसाद मिळू शकणार आहे. लशीच्या दराबाबत देशातील कंपन्या केंद्र व राज्य सरकारला वेगळा दर लावत असून पालिकांना वेगळा दर लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पालिका या लशीसाठी १०० ते २०० रुपये जादा मोजण्यासही तयार आहे.