मुख्यालयातील ४ पोलीस निलंबित

नवी मुंबई महानगरपालिकेतील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर कारवाई सुरू केली असताना आता नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर बडगा उगारला आहे. गैरहजर राहणाऱ्या आणि त्यांना त्यासाठी ‘मदत’ करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

पोलीस मुख्यालयात तैनात हवालदार, शिपाई सातत्याने गैरहजर राहिल्याने तसेच या पोलिसांची हजेरी लावणाऱ्या हवालदारानेही कर्तव्यात कसूर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

नेरुळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कर्तव्य बजावताना हलगर्जीपणा केल्याने आयुक्तांनी मागील आठवडय़ात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस दलात निष्काळजीपणाला थारा नाही, असा संदेशच आयुक्तांनी या कारवाईतून दिला होता. या घटनेला एक आठवडा उलटत नाही तोच रोडपाली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयामधील तीन पोलीस वेळोवेळी नेमणुकीच्या ठिकाणी गैरहजर राहिल्याचे नोंद झाले होते. भगवान पाटील, बाळू नलगे आणि अनिल मांडोळे या तिघांवर सुमारे १३२ दिवस कामावर उपस्थित नसल्याचा अहवाल पोलीस आयुक्त नगराळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्या जमादार युवराज बावीस्कर यांचाही नामोल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता.

विशेष पथक

पोलीस मुख्यालयात डय़ुटी वाटणाऱ्या पोलिसाच्या हातावर चिरीमिरी देऊन कर्तव्याचे १२ तास मुख्यालयाबाहेर स्वत:ची कामे करणाऱ्या ‘पोलिसिंग’ची माहिती आयुक्त नगराळे यांना लागली होती.आयुक्तांनी यावर लक्ष्य ठेवण्यासाठी एक पथक नेमले होते. या पथकाला पाटील, नलगे, मांडोळे हे तीन पोलीस कर्मचारी हजेरीपटावर हजर; मात्र नेमणुकीच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे सापडले. या घटना दोन वेळा घडल्यावर. संबंधित घटनेची चौकशी चौकशी झाल्यावर त्याबाबतच्या चौकशीत हे तिघेही व त्यांच्या हजेरी लावणाऱ्या बावीस्कर याच्यावर आयुक्तांनी बुधवारी कारवाई करून कामचुकार वृत्तीला दणका दिला.

ही कारवाई पोलीस विभागाने संबंधित पोलिसांना दिलेल्या पॉइंटला ते अनेक दिवसांपासून गैरहजर राहिल्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा पोलीस विभागातील अंतर्गत शिस्तीचा भाग असून ही रूटीन कारवाई आहे.

– वरिष्ठ पोलीस अधिकारी, नवी मुंबई पोलीस मुख्यालय