५० टक्के भागीदारी उचलण्याची तयारी

नवी मुंबई : मागील काही वर्षांत आर्थिक अडचणीत सापडलेल्या जीव्हीके उद्योगसमूहातील ५०.१ टक्के भागीदारी उचलण्याची तयारी ‘अदाणी इंटरप्राइस लिमिटेड’ने दर्शविली आहे. नवी मुंबई विमानतळाचे भवितव्य आता अदाणी उद्योगसमूहावर सोपविले जाणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी जीव्हीके उद्योगसमूहाच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या बांधकाम कंपनीला नवी मुंबई विमानतळाचे १६ हजार कोटी रुपये खर्चाचे काम सिडकोने दिले होते. आता हा प्रकल्प १७ हजार कोटी रुपये खर्चाचा झाला आहे. चार बांधकाम कंत्राटदारांच्या स्पर्धेत मुंबई विमानतळाचे नूतनीकरण करणाऱ्या जीव्हीकेला हे काम देणे सिडकोला तीन वर्षांपूर्वी भाग पडले होते.

मुंबई विमानतळाचा मेकओव्हर करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या बांधकाम कंपनीला नवी मुंबई विमानतळाचे कामदेखील तीन वर्षांपूर्वी (ऑक्टोबर २०१७) देण्यात आले होते. मुंबई विमानतळाचा मेकओव्हर करताना एमएमआरडीए क्षेत्रात कुठेही दुसरा विमानतळ प्रकल्प आल्यास त्या विमानतळाचे बांधकाम जीव्हीके कंपनीला देण्यात यावे, अशी अट घालण्यात आली होती. त्या वेळची आर्थिक स्थिती आणि मुंबई विमानतळाच्या मेकओव्हरसाठी मिळणारा कमी प्रतिसाद पाहता नागरी उड्डाण मंत्रालय व राज्य सरकारने ही अट मान्य केली होती. त्यामुळे राज्य सरकारला नवी मुंबई विमानतळ उभारण्याचे काम दराची तोडजोड करून देणे भाग पडले होते.

जीव्हीके लेड या कंपनीने विविध अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांकडे दहा हजार कोटी रुपये कर्जाची मागणी केली. प्रारंभी एस बँकेने या प्रकल्पाला वित्तपुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी या बँकेच्या अनियमित कर्जपुरवठय़ामुळे बँक अडचणीत सापडली. त्यानंतर जीव्हीकेने एसबीआय बँकेबरोबर कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हा प्रस्ताव दाखल केलेला असतानाच जीव्हीके कंपनीचे पत मानांकन घसरल्याचे जाहीर झाले. ही संधी साधून सिडकोने या कंपनीला कंत्राट रद्द का करू नये, अशी नोटीस बजावली.

विद्यमान आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जीव्हीके कंपनीने आपल्या कंपनीतील ५०.५ टक्के हिस्सा हा उद्योगपती गौतम अदाणी यांच्या अदाणी इंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीला विकण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकर केली जाणार आहे.

* एकूण खर्च १७ हजार कोटी

एकूण जमीन २२६८ हेक्टर

* प्रकल्प पूर्णत्वाची पहिली मुदत डिसेंबर २०१९ आता डिसेंबर २०२२