लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : पनवेल पालिका हद्दीतील रुग्णांसाठी सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोकडून गेले दोन महिने जागेचा शोध घेण्यात येत आहे. तो अपुरा ठरल्याने कळंबोली येथील दोन मजली समाज मंदिराच्या जुन्या इमारतीतील तळमजल्याची जागा निश्चित करण्यात आली. मात्र, शहराला किमान १०० अतिदक्षता खाटांची आवश्यकता असताना अशा केवळ १२ खाटाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर निश्चित केलेली जागा सोयीसुविधा उभारण्यासाठी ‘पात्र’ नसल्याचा शेरा सिडको प्रशासनाने मारला आहे.

समाज मंदिरात उद्वाहन यंत्रणा नाही. त्यामुळे दोन्ही मजल्यांवर अतिदक्षता विभाग सुरू करता येणे शक्य नसल्याचे सिडकोकडून सांगण्यात आल्याचे समजते.

पनवेलमध्ये २५ हजार जण बाधित झाले आहेत. आता करोनाची दुसरी लाट शहरात धडकली असतानाही कोविड रुग्णालयाची उभारणी होणार की नाही, असा सवाल केला जात आहे.

मग इतका खर्च का?

कोविड रुग्णालयासाठी समाज मंदिराच्या जुन्या इमारतीची  सिडकोकडून रंगरंगोटी सुरू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी  महाआघाडीचे नेते व शेकापचे आमदार बाळाराम पाटील तेथे गेले होते. यावेळी १२ अतिदक्षता खाटांची उभारणीच शक्य असल्याचे कळविल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालकांसोबत तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगितले. १२ खाटांसाठी इतका खर्च कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे.

उच्चस्तरीय बैठकीचे हेच फळ?

यानंतर महाआघाडीप्रणीत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन पाटील, आर. सी. घरत, आमदार बाळाराम पाटील, सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, शेकापचे गणेश कडू यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात सिडको मंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन २२ सप्टेंबरला पनवेलमध्ये २०० खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र १२ खाटांचेच नियोजन सुरू आहे.