शेखर हंप्रस, नवी मुंबई

घरासमोरील रस्ता ओलांडणे कठीण; इमारतीच्या फाटकापासूनच कोंडीत अडकण्याची वेळ

सध्या सर्वत्र आंदोलनाचे वारे वाहत आहेत. मराठा आंदोलन झाल्यावर राज्यभर धनगर समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. नवी मुंबईही एका मोठय़ा आंदोलनाच्या उंबरठय़ावर उभी असून ते आंदोलन आहे वाहतूक कोंडीच्या विरोधात. ऐरोलीतील वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची भीती आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचे काम रखडल्याने नवी मुंबईतील रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. हे काम किती दिवस चालणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ही प्रचंड वाहतूक जर महामार्गावरून असेल तर फारसा फरक पडत नाही. मात्र या वाहतुकीचा काही भाग ऐन रहदारीच्या निवासी भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. त्याचा कधीही उद्रेक होऊ  शकतो अशी परिस्थिती आहे. याची झलक नुकत्याच झालेल्या एका अपघाताने दाखवली. ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला ट्रकने उडवले त्यात त्याच्या एका पायाचे हाड मोडले. संतप्त रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको केले. यात काही वेळाने सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनीही सहभाग घेतला.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचे काम सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. त्यामुळे नाशिक, ठाणे मराठवाडय़ाकडून मुलुंड, मुंबई, अंधेरी सीप्झ येथे जाणाऱ्या जड वाहनांना ठाणे-बेलापूर मार्गाचा वापर करावा लागत आहे.

या मार्गावरून जाताना रबाळे नाका ते मुलुंड-ऐरोली खाडी पुलादरम्यान ऐरोली नोडमधील रहिवासी भागातून जावे लागते. हा रस्ताच मुळात अरुंद असून त्यावर दोन्ही बाजूंनी असलेल्या महामार्गावरील गाडय़ा जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि छोटे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यातच मुंब्रा बाह्य़वळण मार्ग गेल्या महिन्यात खचला. त्यामुळे लहान वाहनेही याच मार्गावरून वळवण्यात आली व कोंडीत भर पडली.

ऐरोली नोडमधून जाणारा हा रस्ता सुमारे एक किलोमीटरचाच आहे, मात्र तो पार करण्यासाठी सेक्टर ३ आणि सेक्टर-१७ चे सिग्नल पार करावे लागतात. सेक्टर-१७ चे सिग्नल नवी मुंबईतील सर्वात जास्त काळाचे सिग्नल आहेत. याच रस्त्यावर शाळा, व्यावसायिक गाळे, पेट्रोल पंप, हॉटेल्स आहेत.

एक किलोमीटरच्या पट्टय़ात ही सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून जाण्यास जड वाहनांना किमान पाऊण तास तर कारला २५ ते ३० मिनिटे लागतात.

या सर्वात भरडला जात आहे तो या ठिकाणाचा रहिवासी. रस्ता ओलांडण्यासाठीही किमान २० मिनिटे लागत आहेत. या एक किलोमीटरच्या पट्टय़ात ऐरोली सर्कलवरच पादचारी उड्डाणपूल आहे त्या व्यतिरिक्त सर्वत्र पळत पळतच रस्ता ओलांडावा लागत आहे. सोसायटीच्या गेटबाहेरच वाहतूक कोंडी असल्याने घरातून गाडी बाहेर काढल्या काढल्या ती वाहतूक कोंडीत अडकते. त्यामुळे कामाला जाण्यासाठी किमान अर्धा तास लवकर निघावे लागत आहे.

बाह्य़वळणाच्या कामाचा वेग वाढणे आवश्यक!

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामाला वेग आल्यास आणि वाहतूक पोलिसांचे संख्या बळ वाढवल्यास ही समस्या सुटू शकते. मात्र मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामाला वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने या त्रासातून सुटका कधी होईल याची वाट येथील रहिवासी पाहत आहे. हे दोन्ही होत नसल्याचा परिणाम नुकत्याच झालेल्या अपघातातून दिसून आला. रास्ता रोको करण्यात आला तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी (वाहतूक पोलिस) नागरिकांची अक्षरश: मनधरणी केली त्यामुळे थोडक्यात आंदोलन आटोपले मात्र नेहमीच असे होईल याची शाश्वती पोलिसांनाही नाही.