दूध, भाज्या, किराणा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळा पाळत रांगेत उभे राहण्याची कसरत आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून होणारी कारवाईयामुळे कंटाळलेले नवी मुंबईतील नागरिक आता टाळेबंदीविरोधात उघडपणे मतप्रदर्शन करू लागले आहेत. टाळेबंदी अशाच प्रकारे वाढत राहिली तर मध्यमवर्गीयांनी जगायचे कसे, असा प्रश्न नवी मुंबईकर महापालिकेच्या फेसबुक पानावर जाऊन विचारत आहेत.

टाळेबंदीने होरपळणाऱ्या नागरिकांत सध्या नवी मुंबईकरांची भर पडली आहे. नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेने गेल्या दहा दिवसांपासून लागू केलेली टाळेबंदी आणखी सहा दिवस वाढवल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पनवेल महापालिकेने टाळेबंदीची मुदत वाढवताना किराणा आणि भाजीविक्रीलाही मज्जाव करत नागरिकांना घरपोच सेवा देण्याच्या सूचना दुकानदारांना केल्या आहेत. मनुष्यबळाअभावी दुकानदारांनी अशी सेवा देण्यापेक्षा दुकाने बंद ठेवली आहेत. दूधविक्रीची दुकानेही अवघी पाच तास सुरू ठेवण्यात आल्याने सकाळच्या सुमारास नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. ही परिस्थिती ‘८०च्या दशकातील रांगांची आठवण करू देत आहे’ अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

त्रास आणि अडवणूक..

नवी मुंबईत किराणा दुकानदार घरपोच सुविधा देण्यास असमर्थ आहेत, तर मोठमोठी डिपार्टमेंटल दुकाने पोलीस खुलीच करू देत नाहीत. परिणामी डीमार्ट, रिलायन्स यांच्या घरपोच किराणा पुरवठा सेवा अतिशय मर्यादित प्रमाणात सुरू आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या नाकाबंदीने नाकीनऊ आणले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठीच्या परवानगीचे पत्र असतानाही पोलिसांकडून होणारी अडवणूक नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.