एपीएमसीचे नवीन मोबाईल अ‍ॅप

नवी मुंबई : एपीएमसी बाजार आवारात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता एपीएमसी प्रशासन मोबाइल अ‍ॅप तयार करीत आहे. ही प्रणाली लवकरच कार्यरत होणार असून याद्वारे शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करता येणार असून ग्राहकांना घरपोच माल मिळणार आहे.

नवी मुंबईतील एपीएमसीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ग्राहक शेतमालाची घाऊक खरेदी करत असतात. यामुळे या बाजारातील पाचही बाजार आवारांत दिवसभर मोठी वर्दळ असते. सध्या करोनाचा मोठा प्रादुर्भाव एपीएमसीत होत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत अनेकदा एपीएमसी बंद करण्याची वेळ आली आहे. सद्य:स्थितीत गर्दी टाळण्यासाठी शेतमाल थेट मुंबई, ठाण्यात जात आहे. काही प्रमाणात शेतमाल एपीएमसीत येत आहे. यामुळे एपीएमसीच्या उत्पनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासन ऑनलाइन खरेदी-विक्रीचा मार्ग अवलंबत आहे. यासाठी एका मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होणार असून प्राथमिक तपासणी ही प्रणाली सुरू करण्यात येईल, अशी माहिती एपीएमसी सचिव अनिल चव्हाण यांनी दिली.

ग्राहक ऑनलाइन शेतमालाची नोंदणी करतील तर व्यापारी, अडते, वाहतूकदार हे मागणीनुसार नोंदणी केलेल्या ग्राहकांना शेतमाल पोहोच करतील. यामध्ये व्यापारी, दलाल यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर खरेदीदार आणि व्यापारी यांना ऑनलाइन व्यापार करता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये दर्जानुसाार वस्तू आणि त्यांच्या किमती देण्यात येणार आहेत.