कडक टाळेबंदीसाठी अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

नवी मुंबई : शासनाच्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी दोन दिवस टाळेबंदी असणार असून त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक प्रशासनाबरोबर पोलिसांची असणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नियोजन केले असून अडीच हजार पोलीस प्रत्यक्ष बंदोबस्तात असणार आहेत. नागरिकांना त्रास होऊ  न देता बंदोबस्त पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र निर्बंध तोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईतून मोठी वाहतूक ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल महामार्गावर होते. त्यात आठवडाअखेर असल्याने बाहेरच्या गावी जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये खारघर आणि कळंबोली व जुन्या पुणे नाक्यावर नाकाबंदी करीत चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात बाहेरगावी जाणाऱ्यांवर निर्बंध नसणार आहेत, मात्र सहल वा सुट्टी साजरी करण्यासाठी जाणाऱ्यांना परत पाठविले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक वाहनाची तपासणीही केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत किमान चार ठिकाणी व शीव- पनवेल महामार्गावर सहा ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. याशिवाय १५ गस्त पोलीस पथके असणार आहेत.

परिमंडळ एकमध्येही पामबीच, छ. शिवाजी महाराज चौक वाशी, ठाणे-बेलापूर महामार्ग, ऐरोली मुलुंड रस्ता या ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणी हुल्लडबाजी होऊ  शकते, जमाव होऊ  शकतो अशाही ठिकाणी पोलीस गस्त असणार आहे.

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी सह आयुक्त सर्व उपायुक्त, साहाय्यक आयुक्त उपस्थित होते. बंदोबस्ताबाबत आयुक्तांनी सूचना देताना नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करू नये, अशा विशेष सूचनाही दिल्या आहेत.

दोन दिवसांची कडक टाळेबंदी ही सहलीसाठी नसून कोरोना नियंत्रणासाठी आहे, हे लक्षात घ्यावे. नागरिकांच्या सहकार्याने टाळेबंदी यशस्वी होऊ  शकते. ज्यामुळे करोना नियंत्रणात येऊ  शकतो. आम्ही आवाहन करतो नागरिकांनी सहकार्य करावे.

-शिवराज पाटील, उपायुक्त, परिमंडळ दोन 

नवी मुंबईत लावण्यात आलेली टाळेबंदी ही जनतेच्या हिताची असून त्याची पायमल्ली करणे सर्वासाठी धोकादायक आहे. पोलीस आपल्या परीने चोख कामगिरी करणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, अन्यथा गुन्हे नोंद करण्यात येतील.

-सुरेश मेंगडे, उपायुक्त, परिमंडळ एक

विनाकारण फिरणाऱ्यांवर नजर

टाळेबंदी असली तरी अत्यावश्यक सेवा निगडित व्यक्तींना कामासाठी फिरता येऊ शकते, मात्र विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या पाहता अशा लोकांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहेत. शहराच्या अंतर्गत भागात चौकडी जमवून गप्पांचा फड रंगवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.