खुल्या परमिटमुळे शहरात २७ हजार रिक्षा

संतोष जाधव

दोन वर्षांत नवी मुंबईत १५ हजार नवीन रिक्षांची भर पडली असून अधिकृतच २७ हजार रिक्षा आहेत. त्यामुळे प्रवासी मिळविण्यासाठी त्यांची स्पर्धा सुरू आहे. यामुळे ‘एनएमएमटी’चे प्रवासी कमी होत आहेत. दिवसाला ५ लाखांचे उत्पन्न कमी झाल्याचे एनएमएमटीचे मुख्यवाहतूक नियंत्रक अनिल शिंदे  यांनी सांगितले.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस सेवा महापालिकेच्या अनुदानावर सुरू आहे. त्यात ‘बेस्ट’ने ९ जुलैपासून त्यांचे तिकीट दर कमी केले. या निर्णयाचा नवी मुंबई महापालिकेच्या ‘एनएमएमटी’ बस सेवेवर परिणाम दिसू लागला. दिवसाला २० ते २५ हजार प्रवासी कमी झाले आहेत. महिनाभरात सुमारे १ ते दीड कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. प्रवासी कमी होण्यासाठी बेकायदा खासगी प्रवासी वाहतुकीबरोबर शहरात वाढलेल्या रिक्षाही कारणीभूत आहेत.

२०१७ या वर्षी नवी मुंबईत ११ हजार ५०० इतकी रिक्षांची संख्या होती. त्यानंतर परमिट खुले केल्याने शहरात रिक्षांची संख्या बेसुमार वाढली आहे. दोन वर्षांत नवी मुंबईत १५ हजार नवीन रिक्षांची भर पडली असून शहरातील रिक्षांची संख्या २७ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षांची दिवसरात्र स्पर्धा सुरू असल्याचे नवी मुंबईत चित्र आहे. अधिकृत थांब्यांवर प्रवासी मिळविण्यासाठी रांगेत ताटकळत बसावे लागते म्हणून रिक्षाचालक कुठेही थांबत आहेत. त्यात बस स्थानकांचे थांबेच त्यांनी बेकायदा रिक्षांचे थांबे केले आहेत. प्रवासी दिसला न दिसला की त्याला घेण्यासाठी एकाच वेळी तीन-चार रिक्षाचालक प्रयत्न करतात. त्यामुळे तो बस थांब्यावर जाण्याअगोदरच रिक्षा त्याला घेऊन जातात. नवी मुंबईत हा प्रकार सर्वत्र सुरू आहे. त्यात शेअर रिक्षा या नियमात तीन प्रवासी असताना पाच-सहा प्रवासी घेतल्याशिवाय जात नाहीत. यामुळे ‘एनएमएमटी’चे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत.

नेरुळ, वाशी, कोपरखैरणे या विभागात रिक्षांची मोठी संख्या आहे. दिवसभराची कमाई कमी झाली आहे, त्यामुळे नाइलाजास्तव आम्हालाही प्रवासी मिळविण्यासाठी अशी स्पर्धा करावी लागते, असे रिक्षाचालक सांगत आहेत.

परिवहनमंत्री यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडेही रिक्षासाठीचे खुले परमिट धोरण बंद करण्याची मागणी केली आहे.

ओला-उबरचाही रिक्षांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. वाहने जास्त व प्रवासी कमी यामुळे प्रवाशांची पळवापळवी सुरू आहे.-दिलीप आमले,अध्यक्ष, शिव वाहतूक सेना नवी मुंबई