News Flash

कुटुंबसंकुल : शाश्वत विकासाचा वसा

सात वर्षांपूर्वी जेव्हा संकुल बांधण्यात आले, तेव्हापासूनच येथे सौरदिवे बसविण्यात आले आहेत.

बालाजी गार्डन अपार्टमेंट कॉम्प्लेक्स, कोपरखैरणे

‘बालाजी गार्डन’ गृहसंकुलाने आधुनिकतेकडे जाताना पर्यावरणही जपले आहे. ३६८ कुटुंबांच्या या संकुलात पर्यावरणस्नेही प्रकल्प राबवण्यात आले आहेत. शाश्वत विकासाचा वसा या संकुलाने घेतला आहे.

कोपरखैरणे येथे सात वर्षांपूर्वी ‘बालाजी गार्डन’ हे गृहसंकुल साकार झाले. सेक्टर ११ येथे सहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेल्या या संकुलाने आधुनिकतेकडे वाटचाल करताना पर्यावरणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे. निसर्गाने जे दिले त्याचा पुरेपूर वापर, त्याचे शक्य त्या सर्व मार्गानी जतन करण्याचा प्रयत्न येथील रहिवासी करतात. त्यासाठी त्यांनी सौरऊर्जा, सांडपाण्याचा पुनर्वापर, ठिबकसिंचन, पाण्याची बचत असे विविध मार्ग अवलंबले आहेत.

बालाजी गार्डनमध्ये एकूण ३६८ सदनिका आहेत. सोसायटीच्या आवारातील प्रकाशयोजनेसाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. सात वर्षांपूर्वी जेव्हा संकुल बांधण्यात आले, तेव्हापासूनच येथे सौरदिवे बसविण्यात आले आहेत. सोसायटीत उद्यान आहे आणि मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आले आहे. उद्यानात १२ सौरदिवे बसवून विजेची बचत केली जात आहे. त्यामुळे मोफत मिळणारी आणि वाया जाणारी सौरऊर्जा सार्थकी लागते शिवाय विजेचीही बचत होते, असे येथील रहिवासी सांगतात. या संकुलात सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. सर्व घरांतील सांडपाणी पाइपमधून एकत्रित करून ठिबकसिंचन पद्धतीने झाडांना घातले जाते. गेल्या वर्षी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत या संकुलातील सर्व कुटुंबांनी पाणीबचत करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केल्याचे येथील पदाधिकारी सांगतात. संकुलातील तरण तलाव त्या काळात बंद ठेवण्याचा निर्णय सर्व रहिवाशांनी मिळून घेतला.

संकुलाच्या आवारातील प्रशस्त उद्यान विविध वृक्षवल्लींनी बहरले आहे. या हिरव्यागार उद्यानाच्या आतच तरणतलाव तयार करण्यात आला आहे. सामान्यपणे तरणतलावाभोवती दगड-विटांच्या भिंती उभारल्या जातात, मात्र इथल्या तरण तलावाच्या परिसरात भिंती उभारलेल्या नाहीत, त्याऐवजी आजूबाजूला भरपूर झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे तलावात पोहताना निसर्गाच्या सान्निध्याचा पुरेपूर आनंद मिळतो.

तलावाच्या बाहेरच्या बाजूला संपूर्ण गोलाकार हिरवळ आहे. सायंकाळी हे उद्यान गजबजलेले असते. ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडाबरोबर इथे खेळताना दिसतात. काही आजी-आजोबा नातवंडांना उद्यानात खेळण्यासाठी सोडून फेऱ्या मारतात. संकुलातील रहिवासी उद्यानात गप्पा मारताना दिसतात.

संकुलाच्या उद्यानाला वृक्ष प्राधिकरण आणि नवी मुंबई महानगरपालिकेने २००५ पासून २०१६ पर्यंत दरवर्षी उत्कृष्ट उद्यान पुरस्काराने गौरवले आहे. येथील गणेशोत्सवही अनोखा असतो. विविध प्रतिकृती साकार करून उत्कृष्ट मंडळाचा पुरस्कार येथील मिळवतात. गणेश उत्सवातील देखाव्यांचा पूर्ण संच चित्रपटसृष्टीतील मोठा कला दिग्दर्शक बनवितो आणि तोच संच पुढे चित्रपटाकरिता वापरला जातो असे तेथील सदस्यांनी सांगितले.

कडक सुरक्षा व्यवस्था

संकुलात कडक सुरक्षा व्यवस्था असून ४० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटरकॉम प्रणालीच्या माध्यमातून सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. सुरक्षारक्षकांच्या चौकीत येणाऱ्या फोन कॉल्सची माहिती नोंदवलेली असते. कोणता फोन कोठून व कोणी केला ही सारी माहिती तयारच असते.

भव्य दीपोत्सव

दिवाळीमध्ये विजेच्या दिव्यांची रोषणाई केली जात नाही. त्याऐवजी तेलाच्या पणत्या लावून परिसर प्रकाशमय केला जातो. दिवाळीत सुमारे ३ ते ४ हजार पणत्या लावल्या जातात. संपूर्ण संकुल दिव्यांच्या रोषणाईने लखलखते. अशा प्रकारची रोषणाई एवढय़ा मोठय़ा प्रमाणात करणारे हे एकमेव संकुल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 4:12 am

Web Title: balaji garden in kopar khairane navi mumbai
Next Stories
1 कोकणच्या हापूसपुढे तामिळनाडूच्या आंब्याचे आव्हान
2 ग्रामविकासाला चालना मिळणार
3 पनवेलकरांच्या नववर्षांचा आरंभ महागाईपासून
Just Now!
X