28 May 2020

News Flash

बालाजी समूहाविरोधात तक्रारींचा ढीग

नवीन पनवेल परिसरात विहिघर, सुकापूर, आदई येथे विविध गृहप्रकल्प बांधून स्वस्तात घरे देतो

पनवेल गृहघोटाळा
नवीन पनवेल परिसरात विहिघर, सुकापूर, आदई येथे विविध गृहप्रकल्प बांधून स्वस्तात घरे देतो असे सांगून सामान्यांना प्रत्यक्षात घरे न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या बालाजी समूहाचा सर्वेसर्वा महेंद्र पवनकुमार सिंग याच्या अटकेनंतरही खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या पीडितांची रांग लागली आहे. या फसवणुकीतील पीडितांसाठी झटणाऱ्या नवी मुंबई अ‍ॅक्शन फोरमने रविवारी बोलावलेल्या बैठकीत ७० जणांनी आम्ही फसलो असल्याच्या तक्रारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत. यापूर्वी ४ गुन्हे दाखल असणाऱ्या महेंद्र सिंगच्या तक्रारदारांमध्ये झालेल्या वाढीमुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. काँग्रेसने या फसवणूकदारांची बाजू उचलत या प्रकरणातील पीडितांना विधिज्ञ विभागाचे मोफत मार्गदर्शन देणार असल्याने सामान्यांना आधार मिळाला आहे.

पोलिसांनीही या प्रकरणातील सामाजिक दबाव लक्षात घेऊन सिंग याच्यासोबत बालाजी समूहाने स्थापन केलेल्या विविध कंपन्यांमधील त्याचे भागीदार कोण आहेत याची माहिती घेत त्यांनाही या प्रकरणात अटक करण्याची तयारी सुरू केली आहे.
तसेच महेंद्र सिंग याची दिल्लीत असलेली जॅगव्हर कंपनीची आलिशान गाडी जप्त करण्यासाठी पथक पाठविले आहे. पोलिसांनी महेंद्रच्या कार्यालयाला सील ठोकले असून त्या कार्यालयातील संगणकातील हार्डडीस्कवरून माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. महेंद्र याने ज्या शेतजमिनीवर बालाजी समूहाचे फलक लावून सामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे संबंधित जमिनीच्या मालकांना त्याने किती रुपये दिलेत याचीही माहिती पोलीस गोळा करीत आहेत. त्यासाठी शेतजमिनीचे मालकांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी महेंद्रच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार असून महेंद्रने फसवणूक केलेल्यांची रक्कम व्याजासह त्वरित परत करावी यासाठी नवी मुंबई अ‍ॅक्शन फोरमचे सदस्य न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यातील तीन वर्षांत १८ विविध प्रकरणांमध्ये ३० विकासकांनी फसविलेल्या हजारो सामान्य गुंतवणूकदारांसाठी नवी मुंबई अ‍ॅक्शन फोरम एकत्रितपणे लढणार असल्याने फसवणूक करणाऱ्या विकासकांचे धाबे दणाणले आहेत.

सातबाऱ्यावर नावच नाही..
नवी मुंबईच्या रियल इस्टेटमध्ये दलाली करून स्वत:चे घर चालविणाऱ्या महेंद्रने काही वर्षांतच बांधकाम व्यावसायिकांमध्ये चांगल्या ओळखी बनविल्या. भागीदारीत त्याने काही लहानग्या इमारती बनविण्याचे काम सुरू करून स्वत:च्या नावापुढे विकासकाची पदवी लावून नावलौकिक कमावले. त्यानंतर त्याने नवीन पनवेल परिसरातील सुकापूर, आदई, विहिघर या व इतर गावांमधील शेतजमीन मालकांसोबत जमीन खरेदीचे करार करून त्या जमिनींवर गृहप्रकल्पाचे फलक लावले. स्वस्तात घरे देणार अशा जाहिराती केल्या. पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूकडील एकाच इमारतीमध्ये आजूबाजूला समूहाची विविध आलिशान कार्यालये सुरू करून गृहप्रकल्पातील सदनिकांच्या तुलनेत अधिक आगाऊ रकमा स्वीकारल्या. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या गृहप्रकल्पाच्या जमिनीच्या काही सातबाऱ्यावर महेंद्रचे किंवा त्याच्या समूहाचे नाव चढलेले नसल्याने फसवणूक झालेल्यांना या शेतजमिनींवर दावा करणे कठीण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2016 12:04 am

Web Title: balaji group panvel house scam
Next Stories
1 खरा वारसदार कोण?
2 जत्रांमुळे कोंबडी महागली
3 नेरुळमधील ‘डीपीएस’च्या शुल्कवाढीविरोधात मोर्चा
Just Now!
X