07 August 2020

News Flash

अत्यवस्थ रुग्ण वाऱ्यावर

करोना रुग्णालयात केवळ ३७५ खाटांची सोय

करोना रुग्णालयात केवळ ३७५ खाटांची सोय

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : करोनाबाधित रुग्णांसाठी शहरात सात हजार खाटांची व्यवस्था तयार ठेवण्यात आली असल्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबई पालिका क्षेत्रात सध्या अत्यवस्थ रुग्ण वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी खासगी व पालिका रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे प्रकृती चिंताजनक झालेल्या रुग्णांचे उपचार नशिबावर भरवसा सोडून सुरू आहेत.  पालिकेने विशेष करोना रुग्णालयात केवळ ३७५ खाटांची सोय केली आहे. शहरात पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून यातून अचानक अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत दोनशेच्या वर रुग्ण दगावले आहेत. बुधवारी सहा जणांचा मृत्यू झाला. घरातच अलगीकरण केलेले १६ हजार रुग्ण आहेत. पावसाळ्यात करोनाबाधितांची संख्या वाढणार असून यात अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण जास्त असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ‘आसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पालिकेने तीन टप्प्यांत वैद्यकीय आरोग्य व्यवस्था उभारलेली आहे. यात कोविड काळजी केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालयात अशा दोन व्यवस्थेत सौम्य आणि मध्यम लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची व्यवस्था केली जात आहे. ही व्यवस्था पालिकेने मोठय़ा प्रमाणात केली आहे, मात्र शहरात सध्या चिंताजनक बनलेला मुद्दा हा विशेष कोविड रुग्णालयाचा आहे. कोविड रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन पालिकेने मार्चमध्येच वाशी सेक्टर १० येथील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाला विशेष कोविड रुग्णालयात रूपांतर केलेले आहे. कोविड रुग्णालयाच्या नियमानुसार दोन रुग्णांमधील अंतराचे पालन करताना ३०० खाटांचे हे रुग्णालय १२५ खाटा कमी होऊन १७५ खाटांचे झाले आहे. सद्य:स्थितीत १२० रुग्ण उपचार घेत आहेत, पण या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांना खाटा मिळणे मुश्कील झाले आहे.

पालिकेच्या एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्यानंतर अत्यवस्थ वाटू लागले. त्याला पालिकेच्या रुग्णालयात उपचार न मिळता महापे एमआयडीसीतील रिलायन्स या खासगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागले होते. हीच स्थिती नेरुळमधील एका परिचारिकेवर काही दिवसांपूर्वी आली होती. पालिकेच्या कर्मचारी, डॉक्टरावंर ही वेळ येत असेल तर सर्वसामान्य रुग्णांना पालिकेच्या या विशेष कोविड रुग्णालयात उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे.

कोविडची तीव्र लक्षणे आढळणाऱ्या आणि ज्या रुग्णाला व्हेंटिलेटरची नितांत गरज आहे अशा रुग्णांसाठी पालिकेने नेरुळ येथील तेरणा या खासगी रुग्णालयात दोनशे खाटांची व्यवस्था केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंर्तगत या रुग्णालयात गरीब गरजू रुग्ण उपचार घेऊ शकणार आहेत, मात्र या रुग्णालयातही आता अत्यवस्थ रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले आहे. विमा योजनेचे कवच व श्रीमंत रुग्णांसाठी पालिकेने अपोलो, रिलायन्स, फोर्टिस, एमजीएम, डी. वाय. पाटील या रुग्णालयात खाटा आरक्षित केलेल्या आहेत. या रुग्णालयांची भरमसाट बिले भरू शकणारे रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत, मात्र या रुग्णालयातदेखील खाटांची कमतरता जाणवू लागली आहे. जुलै महिना हा करोना रुग्णांची संख्या वाढविणारा ठरणारा आहे. पाच हजार रुग्णांमध्ये सध्या सरासरी पाचशे रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीतील आहेत.

४०० खासगी खाटा

पनवेल पालिकेप्रमाणे नवी मुंबई पालिकेने खासगी आरोग्य सेवेची मदत घेणार आहे. पनवेल पालिकेने ३५० खाटा एमजीएम रुग्णालयात आरक्षित केले असून त्याचे देयके दिले जाणार आहे. नवी मुंबई पालिकेनेही डी. वाय. पाटीलमध्ये ४०० खाटांचे शुल्क अदा करणार आहे.

कोविड रुग्णांसाठी खाटा कमी पडणार नाहीत. डी. वाय. पाटील मध्ये केवळ अत्यवस्थ कोविड रुग्णांसाठी ४०० खाटा आरक्षित आहेत. यात ५० खाटा अत्यवस्थ रुग्णांसाठी असतील.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:08 am

Web Title: beds for serious patients not available in private and nmmc municipal hospital zws 70
Next Stories
1 अग्निशमन दलाच्या जवानांची स्वसंरक्षणासाठीच लढाई
2 नाकाबंदीमुळे नाकीनऊ
3 तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा संयमाचीच तयारी
Just Now!
X