‘एनएमएमटी’च्या ताफ्यात लवकरच २०० पर्यावरणपूरक बस; पालिकेकडून निविदा प्रकिया

नवी मुंबई : नवी मुंबई परिवहन उपक्रमात केंद्राच्या ‘फेम १’ योजनेअंतर्गत सद्या ३० विद्युत बस शहरात सुरू आहेत. ‘फेम २’ अंतर्गत अगोदर १०० बसचा प्रस्ताव मंजूर असून आता आणखी १०० बसचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे पुढील काळात ‘एनएमटी’च्या ताफ्यात २३० विद्युत बस धावणार आहेत.

विद्युत बससाठी प्रति किलोमीटर १६ रुपये खर्च येत आहे तर डिझेल बस चालवण्यासाठी एनएमएमटीला ३० रुपये खर्च येत आहे. त्यामुळे या तोटय़ात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमासाठी विद्युत बस फायदेशीर ठरणार आहेत.

केंद्र शासनाच्या ‘फेम २’ या योजनेअंतर्गत १०० बसला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहेत. करोनामुळे या बस येण्यास उशीर झाला आहे. त्या बस डिसेंबरअखेपर्यंत दाखल होतील अशी शक्यता आहे. विद्युत बस यादेशीर ठरत असल्याने पालिकेने आणखी १०० बसचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. नवी मुंबई शहराबरोबरच महाराष्ट्र तसेच गुजरात, गोवा राज्यांनाही या पर्यावरणपूरक विद्युत बस देण्याचे केंद्राने मंजूर केले आहे.

या पर्यावरणपूरक बस खरेदीसाठी केंद्र शासनाकडून मोठय़ा प्रमाणात अनुदान पालिकेला मिळणार आहे. नव्याने मंजूर झालेल्या १०० बसमध्ये १२ मीटर लांबीच्या ७० बसेस तर ९ मीटर लांबीच्या ३० बस मिळणार आहेत. एक १२ मीटर बसेसची अंदाजित किंमत १ कोटी ५० लाख असून ९ मीटरच्या बसची किंमत १ कोटी १० लाख रुपये असणार आहे. १२ मीटरच्या  एका बससाठी शासनाकडून ५५ लाख तर ९ मीटरच्या बससाठी ४० लाखाचे अनुदान केंद्राकडून प्राप्त होणार आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बसला १ किलोमीटरसाठी १६ रुपये लागत असून  डिझेल बससाठी  मात्र ३० रुपये प्रतिकिमी खर्च येत आहे. त्यामुळे भविष्यात शहरात जास्तीत जास्त विद्युत बस  प्राप्त झाल्याने एनएमएमटीला आर्थिक फायदा होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेला केंद्र शासनाच्या ‘फेम २’ अंतर्गत आणखी १०० बसला मंजुरी मिळाली असून पालिकेला केंद्राचे  मोठे अनुदान प्राप्त होणार आहे. यासाठी निविदा जाहीर करण्यात येत असून डिसेंबरपूर्वी कार्यादेश देण्यात येतील. शहराच्या पर्यावरण संतुलनासाठी या बस अधिक फायदेशीर ठरणार आहेत.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका