सिडको, पालिकेचे एकत्रित प्रयत्न; पाणथळ जागांवर विशेष लक्ष ठेवणार

नवी मुंबई नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यांत मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या राडारोडा माफियांना तोंड देण्यासाठी सिडको व पालिका ही शहरातील दोन्ही प्राधिकरणे एकत्र आली आहेत. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी संयुक्त कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी व पाणथळ जागी राडारोडा माफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेली २० वर्षे पालिका क्षेत्रातील नागरी समस्यांबाबत हात वर करणाऱ्या सिडकोने राडारोडा माफियांचे हे अतिक्रमण रोखण्यासाठी मात्र पालिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील राडारोडा नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात टाकला जात आहे. शहरात येणाऱ्या वाशी, ऐरोली आणि विटावा या तीन मार्गावरून राडारोडाची वाहतूक केली जाते. नवी मुंबईतील खाडीकिनारा, पाणथळ जागा, उद्याने, मोकळी मैदाने आणि रस्ते या राडारोडा माफियांनी लक्ष्य केले आहेत. तिथे राडारोडय़ाच्या गाडय़ा बिनदिक्कत रित्या केल्या जात आहेत. नवी मुंबईतील अनेक भागांत बांधकामे सुरू आहेत. एमआयडीसी भागात कारखाने बंद झाले असून तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत. त्यासाठी तिथे राडारोडय़ाचा भराव टाकला जात आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ला येथील एका बडय़ा गॅरेज चालकाला जागा देण्यासाठी बेलापूर येथे खाडीकिनारी भराव टाकला जात होता. तेथील रहिवाशांनी या विरोधात आवाज उठविल्यानंतर हा भराव थांबविण्यात आला. अशाच प्रकारे एमआयडीसीतील अनेक जागा राडारोडा माफियांना आंदण देण्यात आल्या आहेत. स्थानिक नेते, त्यांचे नातेवाईक, नगरसेवक, पत्रकार आणि अधिकारी यांच्या संगनमताने हे राडारोडा रातोरात रिते केले जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी प्रत्येक गाडीमागे एक ठरावीक रक्कम निश्चित केली जात असून दिवसभरात काही हजारांच्या घरात रक्कम जमा होत आहे. हे घटक या बदल्यात स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिका अधिकाऱ्यांना ‘सांभाळत’ असल्याचे सांगितले जाते.

वर्षभरापासून हे राडारोडय़ाचे आक्रमण वाढले असून खाडीकिनारे व पाणथळ जागा राडारोडा माफियांचे लक्ष्य ठरत आहेत. सिडको महामंडळाच्या संचालक मंडळात याबाबत नुकतीच चर्चा करण्यात आली. या महामंडळात कोकण विभागीय आयुक्त तसेच नवी मुंबई पालिका आयुक्त संचालक असल्याने त्यांची जबाबदारी मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राडारोडा माफियांच्या अतिक्रमणावर चांगलीच चर्चा झाली. नवी मुंबईला ६०  किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वच प्राधिकरणांची असल्याचे स्पष्ट करून सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी यांनी संयुक्त कृती दल प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. यांना केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचा निर्णय अंतिम ठरणार आहे. आर्थिक साहाय्यदेखील सिडको करणार आहे.  पालिकेचे एक दक्षता पथक आहे, मात्र ते १६० किलोमीटर क्षेत्रफळावर लक्ष ठेवण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे संयुक्त कृती दल पथकात सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहे.

सीसीटीव्हीचीही नजर

विटावा, ऐरोली, वाशी, शिळफाटा आणि बेलापूर या नवी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर २४ तास नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे बेकायदा राडारोडा माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी आता पालिकेबरोबरच सिडको देखील सरसावली आहे.