पाच महत्त्वाच्या प्रकल्पांवर ११ हजार कोटी रुपये खर्च; नोव्हेंबरपासून मेट्रो धावणार

नवी मुंबई महामुंबई क्षेत्रात कोणताही नवीन मोठा प्रकल्प हाती न घेता कार्यरत असलेल्या प्रकल्पांवर ११ हजार २६० कोटी रुपये खर्च करण्याची तजवीज करणाऱ्या सिडकोचे भूखंड विक्री व विकास शुल्कातून येणाऱ्या सात हजार ७९७ कोटींच्या कमी उत्पनामुळे तीन हजार ४६२ कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर केला.  सिडकोच्या नऊ हजार कोटींच्या ठेवी विविध वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये आहेत. त्यामुळे तीन हजार कोटींच्या तुटीची सिडकोला चिंता नाही. या पुरेशा ठेवींमुळे सिडको राज्य शासनाच्या प्रकल्पांना अर्थपुरवठा करीत आहे.

केंद्र व राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर सिडकोने एप्रिल १९ ते मार्च २० पर्यंतच्या एका वर्षांचे अंदाजपत्रक सादर केले असून त्याला नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

गेली वीस वर्षे उभारण्यात येणारे विमानतळ, सहा वर्षे रखडलेली मेट्रो, दहा वर्षे सुरू असलेले नेरुळ उरण रेल्वे, या बडय़ा प्रकल्पाबरोबरच सिडको यंदा ‘बीकेसी’च्या धर्तीवर ‘केपीसी’ खारघरमध्ये बांधण्यास सुरुवात होणार आहे. याशिवाय खारघरमध्ये सिडकोने कलादालन  व वस्तुसंग्रहालयाचा संकल्प सोडला आहे. हे तीन प्रकल्प यंदा नवीन असून इतर प्रकल्प गेली अनेक वर्षे सिडकोच्या अंदाज पत्रकात जागा राखून आहेत.

सिडकोच्या नवी मुंबई पालिका क्षेत्रातील बहुतांशी विकास झाला आहे. या भागात असलेले काही मोक्याच्या जागेवरील भूखंड सिडको विकत आहे पण त्यालाही पालिकेने आता आडकाठी घातली आहे. या भागातील शेवटचा नोड हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सिडकोने दोन वर्षांपूर्वी पार पाडली आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंडाशिवाय सिडकोचे या भागातील उत्तरदायित्व संपलेले आहे. बेलापूरच्या पुढील सात नोडमध्ये सिडकोचे अद्याप चांगलेच अस्तित्व आहे. या भागात सिडकोच्या ताब्यात हजारो एकर जमिन अद्याप आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या तीनशे एकर जमिन सिडकोकडे परत आल्याने या जमिनीचाही सिडको गृहनिर्मितीसाठी वापर करणार आहे. त्यामुळे या भागातील भूखंड तसेच सदनिका, वाणिज्य गाळे विकून व येथील विकास शुल्क घेऊन सिडकोला सात हजार ७९७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्या तुलनेते नवी मुंबई विमानतळ, मेट्रो, रेल्वे, खारघर कल्चरल पार्क, आणि ९० हजार घरांची उभारणीवर येत्या वर्षभरात सिडकोचे ११ हजार २६० कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार असल्याने सिडकोला तीन हजार ४६२ कोटी रुपये खर्चाची तूट सहन करावी लागणार आहे. ही तूट सिडकोच्या ठेवी स्वरूपात असलेल्या निधीतून भरून काढली जाणार आहे. सिडकोच्या ठेवीतील रक्कम खर्च झाली तरी सिडकोच्या तिजोरीत साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी वर्षांअखेर कायम राहणार आहेत.

सिडकोचे हे सुर्वण महोत्सवी वर्षे सुरू असून या काळात नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, नेरुळ उरण रेल्वे, खारघर क्लचरल सेंटर, आणि नव्वद हजारांच्या घरांची महागृहनिर्मिती हे महत्वाचे पाच प्रकल्प शहरात सुरू आहेत. यावर ११ हजार २६० कोटी रुपये खर्च करण्याची तजवीज केली आहे.

‘नैना’ विकास आराखडा लवकरच पूर्णत्वास

पाच महत्त्वाच्या प्रकल्पांव्यतिरिक्त सिडकोचा ‘नैना’ हा एक प्रकल्प आहे, पण त्यात सिडको केवळ पायाभूत सुविधांवर खर्च करणार असून शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या जमिनीच्या विक्रीतून हा खर्च वसूल करणार आहे. ‘नैना’ क्षेत्रातील विकास आराखडा तयार करण्याचे काम ९३ टक्के झाले आहे.

नोव्हेंबरपासून नवी मुंबईत मेट्रो

विमानतळ पूर्व प्रकल्पातील ८३ टक्के कामे झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. नवी मुंबई मेट्रोतील पहिला टप्पा चार महिन्यांनी नोव्हेंबर रोजी बेलापूर ते पेंदार होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर

सिडकोने ११ हजार कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प येत्या काळात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे योग्य ते पुनर्वसन करण्यात सिडको यशस्वी ठरली आहे. त्यामुळे येत्या काळात सिडको क्षेत्राचे एक वेगळे रूप पाहण्यास मिळणार आहे.

– लोकेश चंद्र, व्यवस्थापकी संचालक, सिडको