सिडकोकडून खोटी आश्वासने दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप

उरण : नवी मुंबई विमानतळ विकसित करीत असलेल्या सिडकोकडून येथील दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांना खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करीत मानवी हक्कदिनी मंगळवारी प्रकल्प बाधितांनी कोंबडभुजे येथे संमतीपत्राची होळी करून सिडकोचा निषेध केला. या वेळी गावातील महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

विमानतळ बाधितांना शून्य पात्रता देऊन तसेच इतर कारणे पुढे करून त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम सिडकोकडून केले जात आहे. या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी वांरवार लढा देऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर चर्चाही करण्यात आली असे असले तरी कोणताही निर्णय न घेता येथील प्रकल्पग्रस्तांच्या घरावर कारवाई केली जात आहे. या कारवाईलाही विरोध असतांना सिडको केवळ आपल्या हट्टापायी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.

आजवरच्या अनेक विकास प्रकल्पांमधील बाधितांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात आलेले नाही. प्रकल्पबाधित त्याचे परिणाम अद्यापही सोसत आहेत. त्यामुळे विमानतळ प्रकल्पामध्ये असे होऊ देणार नसल्याचा इशाराही या वेळी ग्रामस्थांनी दिला.