दिवसभरात ८५९ जणांना लस; सात खासगी रुग्णालयांत सुविधा

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा नवी मुंबईत नियोजनाअभावी गोंधळ उडाला होता. एकाही खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारपासून शहरात लसीकरण सुरळीत सुरू झाले असून अकरापैकी सात खासगी रुग्णालयांत व पालिकेच्या तीन रुग्णालयांत ही सेवा सुरू झाली आहे.

गेल्या तीन दिवसांत पालिकेच्या तीन केंद्रांवर ५२८ नागरिकांना लस देण्यात आली असून गुरुवारी दिवसभर ८५९ जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.

लसीकरणाबाबत ज्येष्ठ नागरिकांना संताप व्यक्त केल्यानंतर पालिका आयुक्तांनी शहरातील अकरा खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येईल असे जाहीर केले. तेथील आरोग्यकर्मीना लसीकरणाचे प्रशिक्षणही दिले. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत यातील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, डिव्हाइन मल्टिस्पेशालिटी मंगलप्रभू नर्सिग होम, आचार्य श्रीज्ञानेश हॉस्पिटल, डॉ.आर.एन.सुरज हॉस्पिटल, सानपाडा एमपीसीटी हॉस्पिटल आणि  सुयश हॉस्पिटल येथील रुग्णालय व्यवस्थापनाने पैसे भरल्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली असून त्यांनी आजपासून लसीकरण सुरू केले आहे.

आता पालिकेच्या तीन रुग्णालयांसह या सात खासगी रुग्णालयांमुळे शहरात एकूण दहा केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी करताना अडचण येत असल्याने ही प्रक्रिया सोपी करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ज्या लाभार्थ्यांना स्वत:हून नोंदणी करणे शक्य होत नाही असे लाभार्थी बुथवर स्वत: जाऊन आपली नोंदणी करून घेऊन लस घेऊ  शकतात. प्रत्येक लाभार्थ्यांला दोन डोस देण्यात येणार असून दुसरा डोस हा २७ दिवसांनंतर देण्यात येणार आहे. ४२ दिवसांनंतर पोर्टलमार्फत दुसरा डोस घेता येत नाही याचीही नोंद नागरिकांनी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

आतापर्यंत २५ हजार जणांना लस

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला असून आतापर्यंत २५ हजारांहून अधिक करोनायोद्धे व नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणाची वेळ येईल तेव्हा प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.