16 January 2021

News Flash

बेफिकीरांवर कारवाईचा बडगा

प्रत्येक विभागात दीडशेपेक्षा अधिक नागरिकांवर कारवाईचे पालिका आयुक्तांचे आदेश

दिवाळीपूर्वी नियंत्रणात आलेली करोनाची स्थिती नियमांचे पालन न झाल्याने पुन्हा वाढत असल्याने पालिका प्रशासनाने आता शिस्तीचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : दिवाळीपूर्वी नियंत्रणात आलेली करोनाची स्थिती नियमांचे पालन न झाल्याने पुन्हा वाढत असल्याने पालिका प्रशासनाने आता शिस्तीचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक विभाग अधिकाऱ्याला दररोज दीडशे कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पालिका प्रशासनाने मुखपट्टीचा वापर, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीबाबत नवी मुंबईकरांमध्ये जनजागृती केली. मुखपट्टी हीच करोनावर सद्य:स्थितीत लस असल्याचे नागरिकांच्या मनावर वारंवार बिंबविण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवाळीत नागरिकांची बेफिकिरी दिसून आली. परिणामी नियंत्रणात आलेली करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने आता ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर शिस्तीचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके नेमण्यात आली आहेत. करोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक कारवाई वाढविली आहे. प्रत्येक विभागाला कारवाईचे टार्गेटच दिले आहे.  बेलापूर विभागात एका नागरिकाला मुखपट्टी लावण्याची पथकाने विनंती केली असता त्याने नकार दिला. त्याला पोलिसांपुढे उभे करत उठाबशा काढायला लावत दंड वसूल केला. अशी सक्ती करण्याची वेळ पथकावर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अशी होणार कारवाई

ल्ल सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार

ल्ल मुखपट्टी न लावल्यास ५०० रुपये

ल्ल सुरक्षित अंतर न ठेवल्या २०० रुपये

ल्ल व्यापारी, दुकानदार यांना २ हजार रुपये दंड

करोनाला हरवण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने करोना नियमावलीचे पालन केले पाहिजे. दंड वसूल करावा लागू नये असे नागरिकांनी वागावे. नागरिक शिस्तीचे पालन करत नाहीत, त्यामुळे अशी कारवाई करावी लागत आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महानगरपालिका

नवी मुंबईत १८० नवे रुग्ण

नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी १८० नवे करोनाबाधित आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या  ४७,५५० इतकी झाली असून मृतांचा आकडा ९६९ इतका झाला आहे. शहरात करोनामुक्तीचा दर ९५ टक्के असून एकूण ४५,०७२ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या नवी मुंबईत १,५०९ उपचाराधीन रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 2:29 am

Web Title: coronavirus action against not listeners dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 उपचाराधीन रुग्ण संख्येत वाढ
2 खाडीकिनारा सुरक्षेला प्राधान्य
3 करोनाचा कहर : पनवेलमध्येही रुग्णवाढ कायम
Just Now!
X