नवी मुंबई : नवी मुंबईत सध्या करोना रुग्णविस्फोट सुरू असून दररोज विक्रमी नोंदी होत आहेत. बुधवारी ५१९ हे आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन रुग्ण सापडल्यानंतर गुरुवारी यात दिडशेपेक्षा अधिक रुग्णांची वाढ होत ही संख्या ६८१ पर्यंत गेली आहे. दैनंदिन करोना रुग्णांचा शहरातील हा नवा उच्चांक आहे. तर यामुळे उपचाराधीन रुग्णांतही वाढ होत असून ती चार हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

या नव्या रुग्णवाढीमुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या ही ६१,६७६ इतकी झाली असून करोनामुळे मृतांचा आकडा हा ११५८ इतका झाला आहे. शहरातील एका दिवसातील नव्या करोना रुग्णांची सर्वोच्च संख्या गेल्या वर्षी २० ऑगस्टला ४७७ होती. त्यानंतर बुधवारी २४ मार्च रोजी एका दिवसातील शहरातील नवे रुग्ण ५१९पर्यंत गेले तर गुरुवारी ही संख्या ६८१ पर्यंत गेली आहे.

शहरात वाढणारी करोनाची संख्या ही अत्यंत धोकादायक असून नागरिकांनी अजूनही खबरदारी घेतली नाही तर दैनंदिन रुग्णसंख्या ही एक हजारापर्यंत जाण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

पनवेलमध्येही सर्वाधिक ४२८ नवे रुग्ण

पनवेल : तालुक्यामध्ये गुरुवारी आतापर्यंतचे सर्वाधिक ४२८ दैनंदिन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. अद्याप पन्नासहून अधिक जणांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे यातही वाढ होऊ शकते. त्यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. रायगड जिल्ह्यची करोनाग्रस्तांची संख्या ७० हजारांपर्यंत पोहचली असून यात एकटय़ा पनवेल तालुक्यातील संख्या ४३ हजारांपार झाली असून ८१३ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी  रुग्णालयांमधील खाटा शिल्लक नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवावे लागत आहे.  रायगडसाठी असलेली आरटीपीसीआर प्रयोगशाळा अलिबाग येथे आहे. पनवेलमधील लक्षणे असणाऱ्या रुग्णांना चाचणी केल्यानंतर अहवाल मिळेपर्यंत दोन ते तीन दिवस जात आहेत. या काळात हे संक्षयीत अनेकांच्या संपर्कात येत असल्याने पनवेलमध्ये रुग्णवाढ होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यत सर्वाधिक रुग्ण पनवेलमध्ये असल्याने ही प्रयोगशाळा पनवेलमध्ये हलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी पनवेलमधील संशयितांना खारघर येथील टाटा रुग्णालय व मुंबई येथून एका दिवसात आरटीपीसीआर चाचणी अहवाल दिले जात होते. मात्र आता अहवाल येणरस विलंब होत आहे.

रायगड जिल्ह्यतील ८० टक्के करोनाग्रस्त पनवेलमध्ये असतील तर अलिबागला चाचणी अहवाल पाठवून त्याचा अहवाल उशिरा आल्यानंतर उपचार करणे गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे रुग्णवाढ होत असेल तर जिल्हा प्रशासनाने याचा प्राधान्याने विचार केला पाहीजे. तात्पुरती का होईना, अतिसंवेदनशील परिसर म्हणून पनवेलमध्ये प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

अनपेक्षित वाढ

नवी मुंबई शहरात नवे रुग्ण वाढत आहेत. तर उपचाराधीन रुग्ण महिनाभरात तीन पटीत वाढले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा रुग्णवाढ अत्यंत वेगात होत आहे. चार ते पाच दिवसांतच २००वर असलेले एका दिवसाचे नवे रुग्ण ५००च्या पुढे गेले आहेत. त्यामुळे ही अनपेक्षित वाढ असून धोका अधिक वाढला असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

शहरातील करोना स्थिती

* नवे रुग्ण  : ६८१

* आजचे मृत्यू :      ०

* एकूण मृत्यू  :      ११५८

* एकूण रुग्णसंख्या :   ६१,६७६

* एकूण करोनामुक्त : ५६,३५९

* आजचे करोनामुक्त : १५९

* उपचाराधीन रुग्ण :   ४१५९

बुधवारी वाढलेले विभागवार रुग्ण

* बेलापूर –                    ८९

* नेरुळ –                        ९३

* वाशी –                         ८६

* तुर्भे –                          ७२

* कोपरखैरणे –             १२७

* घणसोली –                ७५

* ऐरोली –                   १२४

* दिघा –                    १५

* एकूण वाढ –            ६८१