नवी मुंबई पालिकेचे नवे आयुक्त अभिजीत बांगर यांची पत्रकार परिषदेत माहिती

नवी मुंबई : शहरातील करोना संसर्गाची साखळी तोडून प्रादुर्भाव रोखणे हे माझे पहिले लक्ष्य असेल. त्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना सात दिवस आणि चोवीस तास सेवेसाठी तत्पर राहण्याचे सूचित केल्याचे नवी मुंबई पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी पत्रकारांशी झालेल्या संवादात स्पष्ट केले.

करोना संकटोचा सर्वानी मिळून सामना करायचा आहे. हे आव्हान मोठे आहे. त्यामुळे यात हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेला ४० हजार प्रतिजन  (अँटिजेन) चाचण्या प्राप्त झाल्या आहेत. पुढेही तातडीने चाचण्या सुरू करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पालिका हद्दीत करोना रुग्णांची संख्या दहा हजारांच्या वर गेली आहे. रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने  खासगी आणि पालिका रुग्णालयांमधील खाटांच्या उपलब्धतेबाबतची माहिती  नागरिकांना मिळेल, अशी  सोय करणार असल्याचे ते म्हणाले. संसर्ग रोखण्यासाठी प्रथम जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरात पालिकेची करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालाबाबतही चोख नियंत्रण ठेवण्यात येईल. प्रादुर्भाव सतत वाढत असला तरी पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा विश्वास स्वत:च्या कामातून मिळवावा. यासाठीही प्रयत्न करणार आहे. शहरात झोपडपट्टी भागात जास्तीत जास्त सर्वेक्षणावर भर दिला जाणार आहे. बाधितांच्या संपर्कतील व्यक्तींचा शोध वाढविण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांची स्थिती जाणून खासगी रुग्णालयांनाही शासनाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करत असल्याबाबतही बारीक लक्ष दिले जाईल. यात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.

खासगी डॉक्टरांची मदत घेणार

माहिती नीट न मिळणे. याशिवाय चुकीची माहित पसरवण्याचे प्रकार केले जात आहे. अशा प्रकारांना पोलीस विभागाशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही केली जाईल. पाकिा आरोग्य विभागात सातत्याने होणाऱ्या बदल्यांकडे  लक्ष दिले जाईल. याच वेळी या विभागाला अधिक सक्षम करण्यावरही भर राहील.  खाटांची तपासणी करून गरजेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी पालिका क्षेत्रातील खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

करोनामुक्तीसाठी शहरातील नागरिकांचे सहकार्य आणि शिस्त अत्यंत गरजेची आहे. माझ्या शहरातील प्रादुर्भाव मी रोखीन, या भावनेने सर्वानी पालिकेला सहकार्य करावे.

 – अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका