लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘कोविड’ डॉक्टराचे एक खास पथक तयार  केले आहे. नवनियुक्त उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्यावर या विभागाच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  वादग्रस्त अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने यांच्याकडे दिलेली कोविड विभागाची  जबाबदारी २४ तासांत काढून घेण्यात आली आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत नवी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या  वाढत असून तिने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर ही संख्या वाढण्याची भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. कायमस्वरुपी आणि प्रतिनियुक्ती अधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावी नवी मुंबईतील सार्वजनिक आरोग्य सेवेत अनेक त्रुटी दिसून येत आहेत. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढीवर होत आहे. एकाच रुग्णवाहिकेमधून करोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांची वाहतूक करणे, माहिती देऊनही रुग्णांना लवकर दाखल करून न घेणे, रुग्ण सापडलेल्या ठिकाणी लवकर फवारणी न करणे, विलगीकरण कक्षातील सेवेचा अभाव अशा अनेक तक्रारी आहेत.

सर्वात प्रथम गेली अनेक वर्षे अतिक्रमण विभाग सांभाळणारे आणि वैद्यकीय क्षेत्राचा दुरान्वय संबध नसलेले वादग्रस्त उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्यावर या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. वाशी येथील विशेष ‘कोविड’ रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हुकूम चालविण्याशिवाय या उपायुक्तांनी काही विशेष कामगिरी केल्याचे दिसून येत नाही. या वादग्रस्त नियुक्ती बरोबरच वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतूरकर या कोविड विभागाचे नियंत्रण करीत होत्या. वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर काही जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

डॉ. ओतुरकर यांच्या जागी ३० मे रोजी कोविड नियंत्रण विभागाची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने यांच्यावर सोपविण्यात आली होती. माजी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी माने यांच्या काही खासगी उपद्व्यापामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी केली होती. त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या या डॉक्टरांना मुख्यालयापासून चार हात दूर ठेवण्यात आले होते. डॉ. माने यांची नियुक्ती २४ तासांत रद्द करुन त्यांच्या जागी डॉ. अजय गडदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सोबत अतिक्रमण विभागाचे वसुली अधीक्षक उत्तम खरात आणि लघुलेखक दुर्गेश आखाडे यांना नियुक्त करण्यात आले.

पावसाळ्यातील आव्हाने

काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून या काळात इतर साथीच्या आजारांचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या साथीबरोबरच जुन्या साथींना आटोक्यात ठेवण्याचे काम पालिकेचे आहे. काही दिवसापूर्वीच मुख्यालयातून नेरुळ येथे बदली करण्यात आलेल्या डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांना मुख्यालयात पुन्हा नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यावर क्षयरोग व एड्स नियंत्रण सारखी कामे सोपविण्यात आलेली आहेत. साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके हे मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांच्या विभागाची  जबाबदारी चव्हाण यांच्यावर आहे.