पालिका प्रशासनाकडून बंदी कडक करण्याचे निर्देश

नवी मुंबई</strong> : करोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बंदचे आदेश पालिका प्रशासनाने दिले होते.

शुक्रवारी पहिल्या दिवशी नवी मुंबई याला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. शहरात बहुतांश दुकाने बंद होती. पालिका प्रशासन शनिवारपासून याची कठोर अंमलबजावणी करणार असून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमते अशा अनेक ठिकाणांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. अशाच प्रकारे महापालिका क्षेत्रातील पाळणाघरे, डे केअर सेंटर, महिला सक्षमीकरण केंद्र, स्वयंसेवी समूहांच्या सभा तसेच महिला मंडळांची संमेलने व बैठका यांना पूर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे. तशा प्रकारचे आदेश काढण्यात आले असून आठही विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

पानटपऱ्या व खाऊची काही दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली भागात बहुतांश ठिकाणी दुकाने बंद होती. कोपरखैरणे सेक्टर १६ आणि १५ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. दिघा परिसरातील झोपडपट्टी भागातही संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र तरीही अनेक दुकाने सुरू होती.

करोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. शहराच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेला सहकार्य करावे. शहरातील दुकाने सुरू असतील तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे सर्वाच्या सहकार्यातून या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

मास्कवाटपावर निर्बंध

नवी मुंबईत सध्या घरोघरी व सामूहिक मास्क वाटप सुरू आहे. यात इच्छुक उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. मात्र मास्क वाटप करताना गर्दी होऊ  नये याची खबरदारी घ्यावी. अन्यथा ते पालिका प्रशासनाकडे द्यावेत. त्यांचे वाटप करण्यात येईल, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

पनवेलमध्ये शुकशुकाट कडकडीत बंद; रस्ते मोकळे

पनवेल : मोकळे रस्ते, बाजारबंद आणि रहदारीचे प्रमाण अल्प असे चित्र पनवेल शहरात शुक्रवारी पाहायला मिळाले. करोना विषाणूविरोधात रविवारी जनता संचार बंदीची घोषणा गुरुवारी रात्री पंतप्रधानांनी केली असली तरी पनवेल पालिकेच्या पूर्वसूचनेमुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शुक्रवारपासूनच सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवेमध्ये मांसाहार, किराना, औषधाची दुकाने वगळता व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने पनवेल कडकडीत बंद पाहायला मिळाला.

खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल येथे मोठय़ा प्रमाणात व्यापाऱ्यांनी बंद पाळला. दुधाच्या डेअरी, किराना मालाचे दुकान, भाजीपाला व फळभाज्यांसह औषधांची दुकाने, रुग्णालय सुरू होती. पालिकेचे पथक दुकाने बंद करण्यासाठी पालिका क्षेत्रातील विविध वसाहती व शहरामध्ये भोंग्यावर गुरुवारपासून माहिती देत होते. रेल्वे स्थानक व बसआगारावर नेहमीपेक्षा २० टक्के प्रवासी दिसत होते.

रविवारच्या मांसाहाराची आजच खरेदी

शुक्रवारपासून पालिका क्षेत्र बंद राहणार असल्याने अनेकांनी ‘डीमार्ट’सारख्या मोठय़ा व्यापारी संकुलामध्ये रांगा लावून प्रवेश मिळविला. त्यामुळे रात्री अकरा वाजेपर्यंत किराना मालाची दुकाने सुरू होती. रविवारी घराबाहेर पडता येणार नाही म्हणून अनेक नागरिकांनी चिकन व मटन खरेदीवर भर दिला. शुक्रवारी चिकनचा दर प्रतिकिलो ५० रुपयांवर गेला होता. बुधवारीहा दर तीस रुपये किलो होता. उरण नाक्यावरील मासळी बाजारात शुक्रवारी गर्दी पाहायला मिळाली. सहा पापलेट साडेतीनशे रुपये दराने मिळत होते. कोळंबी किलोग्रॅमला अडीचशे रुपयांनी विक्री केली जात होती.