लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : दिवाळीनंतर करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या ९६९ इतकी आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढली तरी चालेल, पण करोना मृत्युदर शून्यावर आणण्याचे गणित अद्याप पालिका प्रशासनाला सोडवता आले नाही.

दिवाळीपूर्वी शहरात करोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. दिवसाला तीनशे ते चारशेच्या घरात असलेली रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील अनेक काळजी केंद्रे बंद केली होती. अत्यवस्थ रुग्णही कमी झाल्याने अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा वाढविण्याचे नियोजन पुढे ढकलले होते.

मात्र दिवाळीत नागरिकांच्या बेफिकिरीमुळे दिवाळीनंतर करोनाबाधितांत वाढ झाली आहे. आता दरदिवशी दोनशेच्या घरात बाधित सापडत आहेत. शहरात बाधितांची संख्या ४७,५५० पेक्षा अधिक झाली आहे, तर बुधवापर्यंत ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील मृत्युदर इतर शहरांच्या तुलनेत कमी असला तरी दररोज तीन ते चार करोना मृत्यू होत आहेत. जुलै महिन्यात शहरातील मृत्युदर हा ३.२६ होता. त्यानंतर तो कमी होत ऑक्टोबरमध्ये तो २.०५ टक्केपर्यंत कमी झाला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी झाली. मात्र दररोजच्या मृत्यूचे प्रमाण मात्र कायम होते. दिवसाला सरासरी तीन जणांचा मृत्यू होत होता. बुधवारी तर करोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवाळीनंतर आजपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस वगळता करोनामुळे शहरात मृत्यू झाला नाही असा दिवस जात नाही. त्यामुळे पालिकेला करोना मृत्यूबाबत आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

ज्येष्ठांना अधिक धोका

शहरात करोनामुक्तीचा दर हा  ९५ टक्के आहे. मृत्युदरही कमी झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यात सातत्य आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

शहरातील करोना मृत्युदर कमी आहे. परंतु इतर आजार असलेल्यांचा करोनामुळे मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. पालिका मृत्यू होऊ  नये यासाठी आरोग्य सुविधा देत असून प्रत्येक मृत्यूबाबत विचारणा केली जात आहे. इतर आजार असलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी
– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका