मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याकडून आज पाहणी; क्षेत्रीय स्तरावरील अकादमीचा प्रस्ताव

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबई पालिकेने शहराचा कायापालट करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले होते. यातून शहराचा नावलौकिक वाढविण्यात पालिकेला यश आले असून आता राजीव गांधी मैदानावर मुंबई क्रिकेट असोसिएशनची क्षेत्रीय अकादमी सुरू करण्याच्या हालचालींनादेखील वेग आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे आणि अन्य सदस्य या मैदानाची पाहणी आज करणार असून भविष्यात राजीव गांधी मैदानावरील या क्षेत्रीय अकादमीतून क्रिकेटचे धडे दिले जातील, अशी शक्यता आहे.

शहरात फुटबॉलचा उदो उदो होत असताना शहरातील तरुण क्रिकेटपटूंकडे पालिका कानाडोळा करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व शहर अभियंता मोहन डगावकर यांनी विविध मैदानांची पाहणी केली होती. मात्र अन्य मैदानांची दुरवस्था झाली असताना बेलापूर येथील राजीव गांधी मैदानावरच अशा प्रकारचे क्रिकेट प्रशिक्षण देणे शक्य असल्याची बाब समोर आली होती.

२८ फेब्रुवारी २००९ साली राजीव गांधी स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर पालिकेने या मैदानासाठी जवळपास १ कोटी ८५ लाख रुपये खर्च करून सुविधायुक्त असे क्रिकेटचे मैदान तयार केले आहे. त्यामुळे देशभरात गौरवलेल्या मुंबई क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेटचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याच अनुषंगाने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आज या मैदानाची पाहणी करणार आहेत.

उदयोन्मुख खेळाडूंना फायदा

मुंबई क्रिकेट असोसिएशन ही गौरवलेली संस्था आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी देशाचे नाव मोठे केले आहे. यापूर्वी खेळाडू तयार करण्यासाठी एमसीए क्रिकेट अकादमी फक्त मुंबईतील आझाद मैदान व बीकेसी येथे उन्हाळी क्रिकेट शिबिरांचे आयोजन करत होती. मात्र यंदा मुंबईपुरतेच फक्त मर्यादित न राहता मुंबई, उपनगरे, ठाणे व नवी मुंबईत या चार ठिकाणी क्षेत्रीय अकादमी सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या अकादमीमुळे शहरातील १४, १६, १९ वर्षांखालील मुलांना तर १९ वर्षांखालील मुलींना क्रिकेटचे मोफत प्रशिक्षण मिळेल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे महापालिकेला पत्र मिळाले असून आज एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीचे पदाधिकारी व सदस्य राजीव गांधी मैदानाला भेट देणार आहेत. या भेटीत क्षेत्रीय अकादमी सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून यामुळे शहरातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्यासाठीच्या भविष्यातील संधी वाढणार आहेत.

– रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा), नवी मुंबई महापालिका.