गणेशोत्सवात कळंबोली येथील डी मार्ट येथे मध्यरात्री दीड वाजता झालेल्या गोळीबारामागे जुगारातील भांडण कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गोळीबार करून फरार झालेला भालसिंग बल याला कळंबोली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने ही कबुली दिली.
गणेशोत्सवात जुगार खेळताना भालसिंग व सितेंद्र शर्मा यांच्यात वाद झाला होता. पाचशे रुपयांवरून तू माझी लायकी काढू नकोस, असे सितेंद्रने सुनावल्याने मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या भालसिंगने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला व सितेंद्रसह अन्य तरुणांना आव्हान दिले. त्याच्या या कृतीमुळे मंडपातून सर्व जण पसार झाले. काही वेळाने भालसिंगही तेथून निघून गेला. या विषयी या तरुणांपैकी कोणीही पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना दूरध्वनीवरून याबाबत कळवल्यानंतर पोलीस तेथे दाखल झाले. या मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यातून भालसिंगने गोळीबार केल्याचे उघड झाले, मात्र भांडणाचे खरे कारण या तरुणांनी पोलिसांपासून दडवून ठेवले. अखेर भालसिंगला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. भालसिंगचे पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. त्याच्याकडे आणखी एक दुनळी बंदूक असून या दोन्ही शस्त्रांचे परवाने रद्द करावेत, असा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठविला आहे.