संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची माहिती

गेली अनेक वर्षे रखडलेले संरक्षण साहित्य खरेदीची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात तीन लाख हजार कोटी रुपयांची साहित्य खरेदी केले जाणार असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी दिली आहे.

एमईटी-एचटीएस- १६ या संरक्षण साहित्य, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयावरील तीन दिवसीय परिषदेचे उदघाटन पर्रिकर यांच्या हस्ते बुधवारी वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकची माहिती सरकारने  जाहीर केली नसून सैन्यदलाने जाहीर केली आहे, मात्र या कारवाईचा निर्णय सरकारने घेतला असल्याने त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे लागेल. २९ सप्टेंबर रोजी घडविण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक हे केवळ कणखर निर्णय व योग्य नियोजनामुळे शक्य झाले आहे. यापूर्वी राजकीय निर्णय क्षमता नसल्याने संरक्षण साहित्य खरेदीचे प्रस्ताव गेली अनेक वर्षे रखडले होते. आतापर्यंत अडीच लाख हजार कोटी रुपयांची संरक्षण साहित्य खरेदी करार झाले असून येत्या सहा महिन्यात यात वाढ होऊन ते तीन लाख हजार कोटी रुपयांचे साहित्य खरेदी केले जाणार आहे.

यात पाणबुडय़ा आणि हेलिकॉफ्टर यांचा समावेश आहे. देशाची यंत्रसामुग्री सिध्दता समाज माध्यमांवर किती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही पण ती युध्दभूमीवर कैकपटीने जास्त असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. संरक्षण साहित्यातील सर्वच तंत्रज्ञान हे भारतीय असू शकणार नाही. त्यातील तंत्रज्ञानातील टक्केवारी वाढवता येऊ शकेल पण काही तंत्रज्ञान व साहित्य आयात केल्याशिवाय पर्याय नाही. पावसाचे पाणी झिरपण्यासाठीही काही काळ जात असल्याने मेक इन इंडियाचे बदल तात्काळ दिसणार नाही पण येत्या काळात सकारात्मक बदल दिसून येणार आहे.

पाचशे ते सहाशे हजार कोटी रुपये पर्यंत असलेली निर्यात मेक इन इंडिया मुळे तीन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण साहित्य बनविताना उत्पादक कंपन्यांना लागणाऱ्या परवानगी रद्द केल्याने उत्पादन वाढले आहे. नवीन तंत्रज्ञान आल्याने रोजगारावर परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

बोलायचे आहे, पण..

सर्जिकल स्ट्राईक वर बोलण्यास माझे रक्त खवळते आहे पण संरक्षण मंत्री म्हणून मला काही मर्यादा असून बोलला तर थोडी अडचण आहे आणि नाही बोलला तरी अडचण आहे अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले.