मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील; आज सामंजस्य करार

बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात अल्पावधीत जगात प्रसिद्ध झालेली चायना फॉरच्युन लॅन्ड डेव्हलपमेंट (सीएफएलडी) कंपनी सिडको क्षेत्रातील नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) भागात शहर वसविण्यास इच्छुक आहे. त्यासाठी त्यांना विस्तीर्ण अशा जमिनीची आवश्यकता असून त्या संदर्भात बुधवारी मुंबईत एक सामंजस्य करार होणार आहे. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीला हिरवा कंदील दिला आहे. सिडकोने नैना क्षेत्रात स्वेच्छा विकास योजना राबवली आहे. त्या अनुषंगाने सिडकोकडे जमीन उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारकडून चार एफएसआय पदरात पाडून पनवेल तालुक्यात हिरानंदानी, इंडिया बुल, अरिहंत यासारख्या बडय़ा विकासकांनी टोलोजंग वसाहती उभारल्या आहेत. या वसाहतीतील काही घरे सरकारला देऊन हा विकास ह्य़ा कंपन्या साधत आहेत. चीनमधील शांघाय, बीजिंग, सिझोन यासारख्या तीस जिल्ह्य़ात अख्खी शहरे वसविणाऱ्या सीएफएलडी या कंपनीला रायगड जिल्ह्य़ात विकास करण्याची इच्छा असून त्यांना विस्तीर्ण अशा जमिनीची गरज आहे. बाराशेपेक्षा जास्त तंत्रज्ञ या कंपनीच्या दावणीला कायमस्वरूपी असून जगातील पहिल्या पाचशे कंपन्यांमध्ये या कंपनीने मागील वर्षी स्थान प्राप्त केले आहे. सिडकोला सरकारने    रायगड जिल्ह्य़ातील २७० गावांजवळच्या ६० हजार हेक्टर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. सिडकोने त्यातील ३७ हेक्टर जमिनीचा विकास आराखडा तयार केलेला आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) सिडकोने शेतकऱ्यांसाठी स्वेच्छाधिकार विकास योजना जाहीर केली आहे. या भागातील जमीन सरकारला बळाचा वापर करून संपादित करता येणार नसल्याने सिडकोने स्वेच्छाविकास योजना आणली आहे. यात शेतकऱ्यांनी सात हेक्टर जमीन सिडकोला हस्तांतरित केल्यास सिडको त्याबदल्यात पावणेदोन एफएसआय देऊन पायाभूत सुविधा पुरविणार आहे. याला अद्याप म्हणावा तसा प्रातिसाद मिळालेला नाही.

खालापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी स्वेच्छा योजनेत रस दाखविला होता. त्याठिकाणी खालापूर स्मार्ट सिटी उभारण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे सिडकोने मेक इन इंडिया कार्यक्रमात या शेतकऱ्यांबरोबर सामंजस्य करार केला आहे. या भागातील शेतकरी स्वेच्छेने चीनमधील या कंपनीला जमिनी देण्यास तयार झाल्यास ही कंपनी या भागात एक अद्ययावत शहर उभारण्यास तयार आहे.