इंधनापोटीचा तोटा कमी करण्यासाठी ‘एनएमएमटी’ प्रशासनाचे नियोजन

नवी मुंबई : आधीच तोटय़ात सुरू असलेली नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस सेवा करोना व इंधन दरवाढीमुळे आणखी अडचणीत आली आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाने आता डिझेलवरील बस हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला असून सद्य:स्थितीत सेवा देत असलेल्या डिझेलवरील बस सीएनजीत रूपांतरित करण्यात येणार आहेत. यापुढे विद्युत बस व सीएनजीवर चालणाऱ्या बस शहरात धावतील असे नियोजन करण्यात आले आहे.

करोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वच क्षेत्रांत आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात इंधनच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मार्चपूर्वी डिझेलचा दर ६५ रुपये होता तो आता ८१ रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे ‘एनएमएमटी’ प्रशासनाचा इंधनापोटी होणार खर्च वाढला आहे. करोनानंतर आतापर्यंत डिझेलच्या दरात सुमारे १६ रुपयांची वाढ झाल्याने ५ कोटींपर्यंत होत असलेला तोटा आता साडेसहा कोटींपर्यंत जात तोटय़ात दीड कोटीची भर पडली आहे. पालिका परिवहन उपक्रमाला दिवसाला सुमारे २०  हजार लिटर डिझेल लागते. त्यात करोनामुळे प्रवाशांच्या संख्येवर निर्बंध आल्यामुळे तिकिटातून येणारे उत्पन्नही कमी झाले आहे. उपक्रमात दोन हजार पाचशे कर्मचारी असून त्यांच्या पगारावरही मोठा खर्च होत आहे. पेन्शन, सुरक्षा तसेच साफसफाई आणि देखभाल-दुरुस्ती याच्यावरही अधिक खर्च होत आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

परिवहन उपक्रमाकडे सध्या ४९२ बस आहेत. त्यापैकी ३० बस या विद्युत बस असून सीएनजीवर सध्या १४२ बस आहेत. विद्युत बसमुळे इंधनापोटी होत असलेल्या खर्चात बचत होत असल्याने पालिका प्रशासनाने यापुढे जास्तीत जास्त बस या विद्युत बस घेण्याचे ठरविले आहे. वर्षभरात दोनशे विद्युत बस केंद्र शासनाच्या फेम योजनेअंतर्गत शहरात धावतील. तसेच सीएनजी बसमुळेही इंधन बचत होत आहे. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या ३२० बस या हळूहळू सीएजीत रूपांतरित करण्याचे नियोजन परिवहन उपक्रमाने आखले आहे. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने अनेक वर्षे चालणाऱ्या डिझेल बस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत. त्यामुळे इंधनापोटी होत असलेला खर्चही कमी होऊ शकतो.

डिझेलपेक्षा सीएनजीचे दर कमी 

शहरात सातत्याने इंधनाचे दर वाढत असल्याने ‘एनएमएमटी’चा तोटा वाढत आहे. त्यामुळे डिझेलच्या गाडय़ा सीएनजीमध्ये रूपांतरित करणे व डिझेलच्या बसपेक्षाही प्रदूषण न करणाऱ्या विद्युत बस वाढवून ‘एनएमएमटी’ला आर्थिक फायदा मिळवून देणे हा उद्देश आहे.

पालिकेचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून परिवहनचा तोटा कमी करण्यासाठी आगामी काळात फक्त पर्यावरणपूरक (सीएनजी व विद्युत) बस चालवण्याचा प्रयत्न आहे. डिझेलवरील चालणाऱ्या बस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत व केंद्राकडून जास्तीत जास्त विद्युत बस घेण्यात येतील.

अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका

एनएमएमटीच्या ताफ्यातील बस

* विद्युत बस :              ३०

* सीएनजी बस :          १४२

* डिझेल बस :               ३२०

*  एकू ण बस :              ४९२