लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : दरवर्षी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीला ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे मुहूर्त जाहीर करणाऱ्या नवी मुंबई पालिकेने गेली दीड वर्षे या स्मृती भवनाच्या कामाची चौकशी लावली असून भवनाच्या घुमटावरील संगमरवर लावण्याचे काम रखडले आहे.

पहिल्या साडेचार वर्षांत होणारे हे भवनाचे काम तब्बल नऊ वर्षे झाली तरी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बारा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पावर आता ३५ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. दरवर्षी पालिका या संपूर्ण भवनाचा एक मुहूर्त जाहीर करून वेळ मारून नेत असल्याचे दिसून येते. हे मुहूर्त टळल्यावर हे नेते शांत होत असल्याचे दिसून येते.

मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृती भवन उभारण्यात यावे, अशी मागणी वाढू लागल्याने पालिकेने मुलुंड-ऐरोली खाडी पुलाजवळील पालिका हद्दीतील एक एकर जमीन सिडकोकडून विकत घेतली. फेब्रुवारी २०११ रोजी या प्रकल्पाला प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली होती. त्या वेळी या प्रकल्पाचा एकूण खर्च हा १२ ते १५ कोटीपर्यंत अपेक्षित होता, मात्र गेली नऊ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाचा आता खर्च ३५ ते ४० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. प्रकल्पाला उशीर झाल्याने करदाता जनतेच्या खिशातील हा अतिरिक्त खर्च लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी आहे.

आंबेडकरी चळवळीतील जनतेच्या लोकभावना लक्षात घेऊन या प्रकल्पाचे २०१७ मध्ये या प्रकल्पातील एका स्थापत्य भागाचे उद्घाटन आटपून घेण्यात आले. श्रीमंत पालिकेला साजेसे अशा या स्मृती भवनाला अधिक चांगली झळाळी यावी यासाठी घुमटावर संगमरवरी दगड बसविण्यात यावे अशी नवीन मागणी जोर धरू लागल्याने प्रशासनाने तसा बारा कोटी रुपये खर्चाचे संगमरवरी दगड बसविण्याचा प्रस्ताव तयार केला. राजस्थानमध्ये अशा संगमरवरी दगडाचे कोरीव काम सुरू आहे. या प्रस्तावाला माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विरोध केला होता तर एन. रामास्वामी यांनी मंजुरी दिली. या भवनाचे अंतर्गत सजावटीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने मध्यंतरी भवनाच्या भिंतींची काही प्रमाणात तोडफोड केलेली आहे. तेव्हापासून या भवनाला गळती लागली असून यंदाच्या पावसात तर हे वास्तू म्हणजे शेवाळे, बुरशी, पापुद्रे, ओलसरपणा यांचे भवन झाल्याचे चित्र आहे. कोटय़वधी रुपये खर्च झालेल्या भवनामध्ये गळती सुरू झाली कशी याची मध्यंतरी अभियंता विभागाने चौकशी सुरू केली असून या चौकशी आणि हलगर्जीच्या फेऱ्यात गेली दीड वर्षे हे भवन लोकार्पणाअभावी रखडले आहे. या भवनाच्या अतिरिक्त खर्चाची चौकशी होणे आवश्यक असून कामाला विलंब होत असल्याने आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झालेल्या आहेत.