सिडकोच्या मोकळ्या झालेल्या भूखंडांची लवकरच विक्री

आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, कॉर्पोरेट पार्क यासारख्या बडय़ा प्रकल्पांच्या मागे लागलेल्या सिडकोचे गेल्या काही वर्षांत त्यांच्या अखत्यारीत असलेल्या छोटय़ा भूखंडांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागाने वर्षभरात मोकळ्या केलेल्या भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला येत्या काळात पाचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी अतिक्रमण विभागाने कारवाई करून मोकळे केलेले भूखंड नियोजन विभागाला कळविले जात होते. त्यानंतर त्यांची विक्री केली जात असल्याने या प्रक्रियेत वेळ जात होता. या काळात पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होत असल्याने अनधिकृत नियंत्रण विभागालाच हे भूखंड विकण्याचे अधिकार देण्यात आले आणि त्यामुळे सिडकोला हा लाभ होणार असल्याचे सांगितले जाते.

ठाणे जिल्ह्य़ातील विकसित भाग सिडकोने नवी मुंबई पालिकेला हस्तांतरित केल्याने येथील छोटय़ा भूखंडांकडे सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. हीच स्थिती दक्षिण नवी मुंबईतील भूखंडांची आहे.

गेल्या काही वर्षांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झाल्याने इतर नागरी कामांना फारसे प्राधान्य दिले जात नाही. सिडकोने नवी मुंबई पालिकेला नागरी सेवा अथवा काही भूखंड हस्तांतरित केलेले आहेत, पण यातील विक्रीयोग्य मोक्याच्या भूखंडांची अद्याप विक्री न करता ते आपल्या ताब्यात ठेवले आहेत. या भूखंडांवर अलीकडे मोठय़ा प्रमाणात अतिक्रण झाले आहे. असे पाच भूखंड सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने गेल्या वर्षी मोकळे केले. या मोकळ्या भूखंडांची विक्री करण्याचे आधिकार व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाला दिल्याने त्यांच्या विक्रीतून सिडकोला २३५ कोटी रुपये मिळाले आहेत. नुकतीच अशा प्रकारे कोपरखैरणे, घणसोली, नेरुळ, पनवेल रेल्वे स्थानकांबाहेर असलेल्या १३ भूखंडांच्या विक्रीची जाहिरात काढण्यात आली आहे. या विक्रीतूनही सिडकोला २००-३०० कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे.

यानंतर पुढील महिन्यात १५ भूखंड अतिक्रमणमुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे सिडकोला आणखी पाचशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्लक्षित भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत भर पडत असल्याने अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम झालेले भूखंड मोकळे करून विकण्यावर सिडको भर देणार आहे.

गेल्या वर्षी सिडकोने पाच अतिक्रमणमुक्त भूखंडांच्या विक्रीतून २३५ कोटी रुपयांची कमाई केली. आताही काही भूखंड विकले जाणार असून त्यातून सिडकोच्या तिजोरीत भर पडणार आहे. अनेक मोक्याचे भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण सिडको हे भूखंड मोकळे करण्यास येत्या काळात प्राधान्य देणार आहे.

शिवराज पाटील, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको.