स्मशानभूमीतील नोंदीतून उघड; पालिकेकडे मात्र शहरातील ८४४ मृत्यूंची नोंद

पनवेल : पनवेलमध्ये करोनामृत्यूंच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली आहे. महापालिका प्रशासनाकडे शहरात आतापर्यंत ८४४ करोना मृत्यूंची नोंद आहे. मात्र शहरातील दोन स्मशानभूमीतील नोंदींनुसार २०६३ इतके करोना मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या मते पनवेलमध्ये जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील उपचार घेत असताना मृत्यू झाला असताना त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे ही तफावत दिसत आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण मृतांची संख्याही फक्त १२५७ इतकी आहे. म्हणजे जिल्ह्यातील एकूण मृतांपेक्षाही अधिक करोनाबाधितांवर पनवेलमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यामुळे महापालिका करोनाबळींची संख्या लपवत आहे किंवा नोंदी करण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे.

पनवेल शहरात महापालिकेच्या दोन स्मशानभूमी असून दिवसाला सरासरी पंधरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांच्याकडे झालेल्या नोंदीत २,०६३ करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे या नोंदीत दिसून येत आहे. २४ तास तीन पाळ्यांमध्ये या स्मशानभूमीत अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे पनवेलकरांनो घराबाहेर विनाकारणाचे फिरू नका, स्मशानभूमीचा धुरांडा शांत राहील, असे आवाहन येथील कर्मचाऱ्यांनी केले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रातील आतापर्यंत ५० हजारांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली. यामध्ये ४५ हजार रुग्ण बरे झाले तर इतरांवर उपचार सुरू आहेत. दिवसाला साडेपाचशे रुग्ण सरासरी आढळत आहेत. पनवेल शहरातील आतापर्यंतच्या मृतांचा आकडा हा ८४४ इतका आहे. मात्र ठाणेनाका येथील अमरधाम आणि पोदी येथील स्मशानभूमीत आतापर्यंत २०६३ इतके अंत्यसंस्कार झाल्याच्या नोंदी आहेत. म्हणजे १,२१९ मृत्यूंची तफावत दिसून येत आहे. याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

दिवसाला पंधरा जणांवर अंत्यसंस्कार

शहरातील दोनही स्मशानभूमींतील कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये अंत्यसंस्काराचे काम करीत असून दिवसाला सरासरी पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी येथील स्थितीचा बोध घेऊन विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी केले आहे.

नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील जे रुग्ण पनवेलमध्ये उपचारासाठी येत होते, त्यांचा मृत्यू पनवेलमध्ये झाल्यावर त्यांच्यावरही पनवेलमध्येच अंत्यसंस्कार त्यांचे नातेवाईक करत होते. त्यामुळे मृतांच्या संख्येत तफावत आढळली असेल. मात्र पनवेल पालिकेने जाहीर केलेली आकडेवारी ही पारदर्शक आहे. – सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका