सुरक्षा, देखभाल, दुरुस्तीअभावी कचराकुंडीत रूपांतर

गणरायाच्या आगमनासाठी नवी मुंबईत उत्साह संचारला असताना पालिकेने गणेशोत्सवाची जय्यत तयारी केल्याचा दावा केला आहे. यासाठी पालिका हद्दीतील २३ तलावांवर विसर्जनाची तयारीदेखील सुरू झाली आहे. मात्र या तलावांच्या दुरवस्थेमुळे कचराकुंडय़ांमध्ये रूपांतर झालेल्या या तलावांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे उशिरा शहाणपण सुचलेली पालिकादेखील तत्परतेने कामाला लागली असून गेल्या दोन दिवसांपासून कार्यकारी अभियंता, विभाग अधिकारी, परिमंडळ उपायुक्त कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

महापालिका हद्दीतील २३ तलावांवर विसर्जनव्यवस्था पालिकेच्यावतीने उभारण्यात येत आहे. यासाठी पालिका पथक कसोशीने कामाला देखील लागले आहे. मात्र या तलावांपैकी अनेकांची अवस्था अतिशय जीर्ण झाली असून तुटलेल्या पायऱ्या, प्रकाश व्यवस्थेचा अभाव, पावसाळामुळे शेवाळयुक्त परिसर, आकर्षक स्वागत कमानींचा दुरवस्था प्रकर्षांने समोर येत आहे. त्याचबरोबर अनेक तलावांच्या विसर्जन घाटावर कचऱ्यांचे ढीग आहेत. पानवनस्पती आणि कचऱ्यामुळे तलावांमधील पाणी दूषित झाले आहे, शिवाय तलाव परिसरातील प्लॅस्टिक व सडलेले खाद्यपदार्थामुळे तलाव परिसरात फिरणेही  कठीण झाले आहे.

सुरक्षारक्षक बेपत्ता

महापालिकेच्या प्रत्येक तलावावर सुरक्षारक्षक असल्याचा दावा पालिका अधिकारी करतात मात्र बहुतांश तलावांवर हे सुरक्षारक्षक बेपत्ताच असल्याचे दिसून येते. त्यामुळे रात्री या तलावांवर दारूच्या पाटर्य़ा रंगत असल्याचे दिसत आहे. परिसरात अनेक ठिकाणी बाटल्यांचा खच पडलेला दिसतो.

गॅबियन वॉलचा उपयोग शुन्य

तलावांचे सुशोभीकरण करताना पालिकेने तलावांचे विभाजन करण्यासाठी दगड रचून इटालियन पद्धतीची गॅबियन वॉल तयार केली आहे. त्यानुसार एका भागात गणपती विसर्जन तर दुसऱ्या भागातील पाणी खराब होणार नाही, यासाठी ही भिंत आहे. परंतु तलावाच्या दोन्ही भागातच दरुगधी झाल्याचे पाहायला मिळते.

करावे गावातील तलावाच्या दुरवस्थेबद्दल पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून विसर्जनापूर्वी तलावांची डागडुजी करावी, अशी मागणी केली होती. तलावाच्या लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत. पाण्यात कोणी पडू नये म्हणून तात्पुरते बांबू लावण्यात आले आहेत. मात्र उत्साहाच्या भरात जर दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण? हा मुख्य प्रश्न आहे.

विनोद म्हात्रे, नगरसेवक, करावे.

नवी मुंबई पालिका हद्दीत २३ तलावांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तलावाजवळची रंगरंगोटी तसेच दुरुस्तीची छोटी मोठी कामे उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. सुरक्षेबाबतही योग्य खबरदारी घेण्यात येऊन विसर्जनाची चोख व्यवस्था शक्रवापर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई.