News Flash

गणेशोत्सव मंडपांच्या उंचीला २२ फुटांची मर्यादा

यंदा प्रथमच ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा

यंदा प्रथमच ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या परवानगीसाठीचे अर्ज यंदा प्रथमच ऑनलाइन उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिवाय उत्सवाच्या मंडपांना उंचीची मर्यादा घालण्यात आली असून २२ फुटांपेक्षा अधिक उंच मंडप उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्सव सुरळीत पार पाडावेत यासाठी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक झाली असून ६ जुलै रोजी मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

नवी मुंबईत लहान-मोठी आणि सोसायटीची धरून सुमारे ४०० गणेश उत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये असून परवानगी मिळवण्यासाठी मंडळांची धावपळ सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात येणार आहे. या परवानग्या विभाग कार्यालय स्तरावर दिल्या जाणार आहेत. नवी मुंबई शहरात सार्वजनिक गणेशोत्सव अनेक ठिकाणी जागेअभावी रस्त्यावर साजरे केले जातात, मात्र वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, याची काळजी घेऊन उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना परवानगी देण्यास प्रशासन राजी आहे.

रस्त्यांवर खड्डे खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. खड्डा खोदणे अपरिहार्य असल्यास तो बुजवण्याची जबाबदारी आयोजक मंडळांवर असणार आहे. त्यासाठी योग्य ते शुल्क अदा करावे लागणार आहे.

यंदा कमानीसुद्धा जास्तीत जास्त दोनच लावता येणार आहेत. ध्वनिप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे.

जाहिरात लावण्यासाठी पालिकेच्या जाहिरात धोरणानुसार वाणिज्य शुल्क आकारण्यात येणार आहे. मैदानात मंडप उभारायचा असेल तर यासाठी निश्चित केलेले शुल्क भरावे लागणार आहे. या नियमांची माहिती देण्यासाठी ६ जुलै रोजी गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, पोलीस, पालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. ही बैठक पालिका मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर दुपारी तीन वाजता होणार आहे.

पालिकेची परवानगी न घेता मंडप उभारल्यास या मंडळ पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. विनापरवानगी जाहिराती लावल्या तर दंड आकारणी केली जाणार आहे.

बेकायदा वीजपुरवठा केल्यास कारवाई केली जाणार आहे. तक्रार करण्यासाठी १८००२२२३०९ या मुख्यालयातील टोल फ्री क्रमांकावर अथवा विभाग कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे   रहिवाशांना आणि नियम पाळण्याचे मंडळांना आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या सूचना

* परवानगीचा अर्ज केला म्हणजे परवानगी मिळाली असे नाही, लेखी परवानगी दिल्यावरच मंडप उभारावा.

*  मंडपाची उंची २२ फुटापेक्षा अधिक नसावी

* मंडपाच्या जवळ २०० लिटर क्षमतेच्या २ टाक्या कायम भरून ठेवाव्या. आगप्रतिबंधक साधने ठेवावी.

* मंडप आरास बंदिस्त असल्यास मोकळा मार्ग भक्तांसाठी ठेवावा. किमान दोन दरवाजे असावेत, जेणेकरून दुर्घटना घडलीच तर बाहेर पडणे शक्य होईल.

* कचऱ्याचे वर्गीकरण करून तो निर्माल्य कलशात गोळा करावा.

* मंडपापासून १५ मीटर अंतरापर्यंतच रोषणाई करता येईल.

* मंडपाच्या प्रवेशद्वारावर पोलीस, अग्निशमन दलाच्या परवानगीच्या प्रती लावाव्या.

* नियमभंग केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.

उत्सवात कुठलाही अडथळा येऊ नये, कायदा सुव्यवस्था राखली जावी, आग वा दुर्घटना घडू नये, वाहतूक नियंत्रण, वीजपुरवठय़ाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काय करता येईल, याबाबत चर्चा झाली. ६ जुलैला मंडळांच्या समवेत बैठक होणार आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.  – रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:10 am

Web Title: ganesh mandap bmc
Next Stories
1 निमित्त : उद्योजक घडवणारी संस्था
2 सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे बालकाचे प्राण वाचले
3 सुविधांसाठी भूखंड देण्यास नकार
Just Now!
X