पुढील वाटचालीबाबत चर्चेची शक्यता

नवी मुंबई राज्यात भाजप सरकार पुन्हा अस्तित्वात येईल, असे गृहीत धरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केलेले माजी मंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी त्यांनी त्यांच्या सर्व सर्मथक नगरसेवकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. त्यात पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यात युती सरकार येईल त्यात मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी ऐरोली मतदारसंघातून  त्यांनी निवडणूक लढविली होती. तेथून ते मताधिक्याने निवडून आले. मात्र राज्यात नाटय़पूर्ण घडामोडी झाल्या. त्यातून भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. आता चार महिन्यांनंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक आहे. नाईकांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबईत यशस्वी झाल्यास पालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष होऊन पालिका निवडणूक लढविण्याची नाईक सर्मथकांची मागणी आहे.

गणेश नाईक यांनी गुरुवारी स्नेहभोजन आयोजित केले आहे, मात्र यात ‘स्वगृही’ परतण्याचा कोणताही विषय नाही. राज्यात भाजपची आज ना उद्या सत्ता येईल. नवी मुंबई पालिकेत गणेश नाईक यांची एकहाती सत्ता येईल. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.

-अनंत सुतार, ज्येष्ठ नगरसेवक, नवी मुंबई पालिका.