स्वच्छता सर्वेक्षणानंतरही जबाबदारी घेण्यास पनवेल पालिका अनुत्सुक

खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा आणि नवीन पनवेल या सिडको क्षेत्रांतील कचरा आणि आरोग्य सेवा हस्तांतरित करून घेण्यास पनवेल पालिका आजही तयार नसल्याचे समजते. सिडको प्रशासनाने ही सेवा १० फेब्रुवारीपर्यंत हस्तांतरित करून घ्या, अशी तंबी पनवेल पालिकेला दिली होती, मात्र आता या महिनाअखेपर्यंत पनवेल पालिका क्षेत्राचे स्वच्छ सर्वेक्षण होणार असल्याने ही सेवा हस्तांतरित करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्वेक्षण होऊन गेल्यानंतरही पनवेल पालिका ही सेवा तूर्त हस्तांतरित करून घेण्यास तयार नसल्याचे समजते.

आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ असलेली पनवेल पालिका कचरा सेवा हस्तांतरित करून घेण्यास तयार नाही. त्यासाठी सिडकोने चार वेळा मुदतवाढ दिली. ३१ जानेवारीला ही मुदत संपली. तेव्हा सिडकोने या क्षेत्रातील साफसफाईचे काम थांबविले. त्या वेळी पनवेल पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे शासकीय कामानिमित्त सिंगापूरला गेले होते. त्यांचा पदभार नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे होता. त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना विनंती करून हे हस्तांतर पुढे ढकलले. त्याची मुदतही शनिवारी संपणार आहे.

देशात सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरू असून पनवेल पालिकेनेही या स्पर्धेत भाग घेतला आहे. लोकप्रतिनिधींचा विरोध असताना पनवेल पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणाचा विडा उचलला आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा देतानाच सिडको क्षेत्रातील साफसफाई हस्तांतरित करून घेतल्यास या मेहनतीवर पाणी फेरण्याची भीती पनवेल पालिका प्रशासनाला आहे. त्यामुळे किमान स्वच्छ सर्वेक्षण होऊदे, त्यानंतर ही सेवा हस्तांतरण करून घेण्याबाबत विचार करू, असा प्रस्ताव पनवेल पालिकेने सिडकोसमोर ठेवला आहे. सिडकोनेही त्याला तत्त्वत: मंजुरी दिली आहे पण या महिन्याअखेर हे सर्वेक्षण होऊन गेल्यानंतरही पनवेल पालिका ही सेवा तूर्त हस्तांतरित करून घेण्यास तयार नाही.

सिडको राज्यातील एक श्रीमंत महामंडळ असल्याने भरलेल्या गाडीला कसले आले आहे सुपाचे ओझे असे पनवेल पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गरीब पालिका असल्याने आणखी काही काळ ही सेवा सिडकोने सांभाळल्यास काय नुकसान होणार आहे, असा सवाल पनवेल पालिकेने उपस्थित केला आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण झाल्यानंतरही ही सेवा हस्तांतरित करून घेण्याची पालिकेची तयारी नसल्याचे स्पष्ट दिसते.

पालिका अनेक समस्यांना तोंड देत आहे. कचरा सेवा सध्या हस्तांतरित करून न घेतल्यास सिडकोला विशेष फरक पडणार नाही, पण आम्ही आता हस्तांतरित करून घेतली तर आम्हाला नक्कीच फरक पडणार आहे.

डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल पालिका