कांदा आणि डाळींच्या दराबरोबर आता लसणाचीही स्पर्धा सुरू झाली आहे. गेल्याच आठवडय़ात किरकोळ बाजारात दोनशे रूपये प्रति किलो भावावरून चांगल्या प्रतीच्या लसणाने आता २३० रूपयांवर उडी मारली आहे.
गतवर्षी याच महिन्यात घाऊक बाजारात लसणाचा भाव ११० रुपये किलो होता. मागणी आणि पुरवठय़ाचे गणित फिसकटल्याने लसणाचे दर अधिक ‘तिखट’ झाले असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चरचरीत फोडणी बसणार आहे.
राज्याला मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान मधून लसणाचा पुरवठा केला जातो. लसणाच्या आकारावर त्याचा भाव ठरतो. तुर्भे येथील लसणाच्या घाऊक बाजारात प्रतीनुसार ६० ते १८० रूपये किलो या दराने लसूण मिळत आहे. किरकोळ बाजारातील विक्रेते मात्र किलोमागे २० ते ५० रूपये कमावत असून, तेथे लसूण ८० ते २३० रूपयांनी विकला जात आहे.
गतवर्षीपेक्षा ही दरवाढ ४० टक्के एवढी असल्याचे येथील व्यापारी राजेंद्र वत्स यांनी सांगितले. लसूण व्यापाऱ्यांनी यंदा अधिक दरापोटी माल बाजारात उशिरा पाठविल्याने ही स्थिती निर्माण झाली असून, फेब्रुवारीत हे चित्र बदलेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या मात्र गतवर्षीच्या तुलनेत किलोभर लसणासाठी दुप्पट रक्कम मोजावी लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला आहे.