लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : दिवाळीनंतर नवी मुंबईतही करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ३५२ दिवसांवर गेला होता. तो कमी झाला असून आता २६५ दिवसांवर आला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करीत पालिका प्रशासनाने करानो चाचण्यांत वाढ केली आहे.

दिवाळीपूर्वी शहरात करोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा ११ नोव्हेंबरला ३५२ दिवसांवर होता. त्यानंतर दिवाळीत नागरिक बिनधास्त घराबाहेर पडले. त्यामुळे दिवसाला नवीन करोना रुग्णांची संख्या दोन अंकांवरून पुन्हा ३ अंकांवर आली आहे. ६१ नवे रुग्ण भाऊबीजेच्या दिवशी सापडले होते. परंतु त्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. सरासरी ही संख्या १५० पर्यंत येऊन पोहोचली आहे.

मार्च महिन्यात करोनाचा नवी मुंबई शहरात शिरकाव झाला. मे महिन्यात करोना रु ग्ण दुपटीचा कालावधी हा ११ दिवसांवरून फक्त ६ दिवसांवर खाली आला होता. दिवाळीपूर्वी शहरातील नवे रुग्ण कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला होता. परंतु नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे व आता करोना गेला या गैरसमजुतीमुळे पुन्हा शहरात गर्दी वाढली. नियमांचे पालन झाले नाही, त्यामुळे करोना रुग्ण वाढत आहेत.

करोनाचे रुग्ण कमी झाले म्हणजे करोना संपला असे नाही. नागरिकांनी सतर्कता बाळगून सामाजिक अंतराच्या नियमावलींचे पालन केले पाहिजे. करोनावर लस उपलब्ध होईपर्यंत प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेत पालिकेला सहकार्य करावे. शहरात रुग्ण दुपटीचा दर हा कमी झाला म्हणजे धोका वाढला आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका सोमवारीही १७४ नवे रुग्ण

ल्ल दिवाळीनंतर वाढत असणारी करोना रुग्णांची संख्या सोमवारीही कायम राहिली. शहरात १७४ नवे रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

ल्ल  शहरात एकूण ४७,२४९ करोनाबधित झाले असून मृतांची संख्याही ९६१ इतकी झाली आहे. दिवाळीअगोदर शहरातील करोनास्थिती नियंत्रणात आली होती. दिवसाला शंभरच्या खाली रुग्णसंख्या गेली होती. मात्र दिवाळीनंतर यात वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.

ल्ल सोमवारी शहरात १७४ जण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण ४४,८७२ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या नवी मुंबईत १ हजार ४१६ उपचाराधीन रुग्ण आहेत.