पालिकेसह लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर; नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून यंत्रणा उभरणीचे काम सुरू

नवी मुंबई :  करोनाच्या दोन्ही लाटेत सर्वाधिक रुग्णांसाठी लागलेल्या प्राणवायू वापराच्या तीनपट प्राणवायू निर्मितीचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने २४ एप्रिलच्या सर्वाधिक रुग्णांसाठी लागणाऱ्या एकूण ३० टन प्राणवायूच्या तीन पट अर्थात ९० टन प्राणवायू साठा ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेच्या निधीबरोबरच लोकप्रतिनिधींचा निधीदेखील वापरण्यात येणार आहे.

दुसऱ्या लाटेत तुटवडा भासलेल्या प्राणवायूची कमकरता पूर्ण करण्यासाठी थेट प्राणवायू प्रकल्प उभारण्याची पालिकेचा संकल्प हवेत विरून गेला आहे. हा प्रकल्प उभारण्यास एकतर कोणतीही उद्योजक पुढे आलेला नाही आणि पालिकेने हा प्रकल्प उभारला तरी करोनानंतर त्याचे करायचे काय या प्रश्नांचे उत्तर न सापडल्याने हे नियोजन बारगळल आहे.

नवी मुंबईत गेल्या वर्षी आठ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सप्टेंबपर्यंत ही संख्या एक लाखांच्या घरात गेली. त्यानंतर  दुसऱ्या लाटेत मार्चनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या ही १४३४ पर्यंत गेली. ही संख्या वाढू न देता कमी करण्याचा पालिका प्रशासनाने प्रयत्न केला आणि त्याला यश आले. मात्र या दुसऱ्या लाटेत प्राणवायूअभावी काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे चित्र आहे. नवी मुंबई पालिकेने तर मुंबई पालिकेच्या कोटय़ातील प्राणवायू  आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्नदेखील केला. उरण मधील एका खासगी कंपनीतून येणारा प्राणवायू रबाले येथील एका कंपनीतून मुंबई, ठाणे या आजूबाजूच्या शहरांना पुरवठा केला जातो. केंद्र व राज्य सरकाने रेल्वेमार्गे प्राणवायू शहरात आणलेले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत किमान प्राणवायू कमी पडू नये यासाठी सरकारने खबरदारी घेतलेली आहे. दुसऱ्या लाटेत असलेली सर्वाधिक रुग्णसंख्या दिवस आणि त्या दिवशी लागलेला एकूण रुग्णांना प्राणवायू यांच्या तीन पट प्राणवायू यंदा तिसऱ्या लाटेसाठी तयार ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार नवी मुंबई पालिका तयारी करीत

असून नवी मुंबईत २४, २५ आणि २६ या तीन दिवसांत सर्वाधिक रुग्णसंख्या (जवळपास दीड हजार) उपचार घेत होती. त्यांच्यासाठी पालिकेचा ३० टन प्राणवायू खर्च झाला होता. या वापराच्या

तीन पट ९० टन प्राणवायू साठा करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्याचे काम सध्या पालिकेचा विभाग करीत असल्याचे डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सांगितले.

१६ काळजी केंद्रे

करोना रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी  दिघा ते दिवाळ्यापर्यंत १६ पेक्षा जास्त कोविड काळजी केंद्र उभाारण्यात आल्या असून तिसऱ्या लाटेसाठी बेलापूर येथे सात मजल्याची एक इमारत व खारघर येथील एक तयार रुग्णालय ताब्यात घेण्याची तयारी ठेवली आहे.

प्रकल्प उभारल्यास करोनानंतर काय?

  •  पालिकेने वाशी येथील सिडको प्र्दशन केंद्राजवळ प्राणवायू प्रकल्प उभारण्याचा निर्णय जाहीर केला होता, पण हा प्रकल्प उभारण्यासाठी कोणताही उद्योजक पुढे येण्यास तयार नाही. या प्रकल्पासाठी ४० ते ५० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
  • केवळ कोविड काळातच या प्रकल्पातील प्राणवायूचा वापर होणार आहे. त्यानंतर काय असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे. त्यामुळे प्रकल्पाऐवजी जास्तीत जास्त प्राणवायू साठा केला जाईल, अशी यंत्रणा उभी केली जात आहे.